आदिवासींच्या उन्नतीसाठीच स्वतंत्र खाते
By Admin | Updated: August 9, 2015 23:13 IST2015-08-09T23:13:12+5:302015-08-09T23:13:40+5:30
विष्णू सावरा : जागतिक आदिवासी दिन उत्साहातपं

आदिवासींच्या उन्नतीसाठीच स्वतंत्र खाते
चवटी : देशात आदिवासींच्या खूप अडचणी आहेत. संधीचे सोने केले तर चांगले दिवस बघायला मिळतात. प्रत्येकाला अडचणी आहेत. शिक्षण तसेच आदिवासी विकास क्षेत्रात खूप अडचणी असून, गैरसाय होत असल्यास आपले ध्येय काय आहे हे ओळखले पाहिजे. आदिवासींच्या उन्नतीसाठीच आदिवासी विकास खात्याची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.
आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने स्व. मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने राज्यस्तरीय गौरव सोहळा व एकलव्य प्रबोधिनीचे उद््घाटन सावरा यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावरा यांनी पुढे सांगितले की, समाज, कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य शिक्षण घ्यावे. आदिवासी समाजाची उन्नती झाली पाहिजे यासाठी आदिवासी विकास खात्याची निर्मिती झाली असून, अनेक योजना राबविल्या जात आहेत. आजही आदिवासी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत असून, येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. योजनात सुधारणा झाल्यास निश्चितच आगामी कालावधीत आदिवासी बांधवांना चांगले दिवस येतील. आदिवासी बांधवांत बुद्धिमत्ता आहे ते सर्वगुण संपन्न असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाल्यास ते पुढे जातील, असे ते शेवटी म्हणाले.
खासदार चव्हाण यांनी आदिवासींवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. तसेच आदिवासी समाजात होणारी घुसखोरी आता होऊ दिली जाणार नाही. कोणाला काय सवलती द्यायच्या त्या द्याव्यात मात्र आदिवासी बांधवांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आदिवासींवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आदिवासींमध्ये पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळविणाऱ्या डॉ. राजेंद्र भालू यांनी कशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन यश गाठले याची माहिती दिली. पोंक्षे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. (वार्ताहर)