वाढत्या उन्हाचा चटका
By Admin | Updated: March 24, 2015 23:16 IST2015-03-24T23:16:03+5:302015-03-24T23:16:21+5:30
झळा : कमाल तपमानाचा पारा ३८.३ अंशांवर

वाढत्या उन्हाचा चटका
नाशिक : काही दिवसांपूर्वी शहरात असलेले ढगाळ वातावरण आता पूर्णत: हटले असून, उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले असून, मार्चमध्येच कमाल तपमानाचा पारा ३८.३ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे.
काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामानाने मुक्काम ठोकला होता. दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस व गारपिटीनेही तडाखा दिला. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन व रात्री पाऊस अशी परिस्थितीही नाशिककरांनी काही दिवस अनुभवली. आठवडाभरापासून मात्र हे वातावरण निवळले असून, सकाळी अकरा वाजेपासूनच कडक ऊन जाणवत आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत शहराच्या तपमानात सुमारे तीन अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी (दि. २०) शहराचे कमाल तपमान ३५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. त्यात रविवारी दोन अंशांनी भर पडून ते ३८ अंशांवर पोहोचले. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे नागरिक डोक्यावर टोपी, उपरणे, तर महिला सनकोट परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. शहरातील रसवंतीगृहे सुरू झाली असून, शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)