बदली प्रक्रियेने वाढली धडधड
By Admin | Updated: January 10, 2016 00:09 IST2016-01-10T00:09:30+5:302016-01-10T00:09:30+5:30
महापालिका : अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी तयार

बदली प्रक्रियेने वाढली धडधड
नाशिक : महापालिकेत वर्षानुवर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने तयार केली असून, त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि. ४ ते ११ जानेवारी या कालावधीत त्यांच्या टेबलवरील संचिकांची यादी तयार करण्याचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले असल्याने प्रशासनाकडून मकर संक्रांतीपूर्वीच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती बदली आदेशाचा तीळगूळ ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेत एकाच ठिकाणी ठरावीक कालावधी होऊनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. संजय खंदारे यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर आता आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासकीय साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. एकाचवेळी बदलीसत्र राबविले जाणार असल्याने पदभार हस्तांतरणाच्या वेळी प्रशासकीय कामकाजात काही अडथळे निर्माण होऊ नये, म्हणून दि. ४ ते ११ जानेवारी या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या टेबलवरील सर्व संचिकांची यादी तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, मागील आठवड्यात अधिकारी व कर्मचारी त्यांच्या टेबलवरील संचिकांची यादी तयार करण्यात व्यस्त होते. महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फोटो अल्बम, सीडी, मूल्यवान दस्तावेज, संचिकेत नसलेले नकाशे यांचीही स्वतंत्र यादी करण्याची सूचना असल्याने अनेकांच्या कार्यालयात फाईलींचा ढीगही साचलेला दिसून आला. संचिकांची यादी तसेच अन्य कागदपत्रांच्या नोंदी तयार करण्याचे काम सोमवारपर्यंत (दि.११) संपवायचे असल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या शनिवारच्या सुटीच्या दिवशीही महापालिकेत हजेरी लावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे संकेत आयुक्तांनी दिले असल्याने अधिकारी व कर्मचारी यांची धडधड वाढली असून, आस्थापना विभागात संपर्क साधून चाचपणी केली जात आहे.
काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रकृतीचेही कारण पुढे केल्याचे समजते; परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. (प्रतिनिधी)