सीबीएस परिसरात वाढले किरकोळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:28+5:302021-02-05T05:45:28+5:30
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्याने बंद केली ...

सीबीएस परिसरात वाढले किरकोळ अपघात
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्याने बंद केली जातात. मात्र, परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर उद्यानांची दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे उद्यानांचे काम हाती घेण्यात आले नसल्याने वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी
नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु,प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. सध्या नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाहीत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सारडा सर्कल परिसराला
पुन्हा वाहनांचा गराडा
नाशिक :गडकरी चौक ते सारडा सर्कल परिसरात रस्त्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. बरेचदा वादावादीचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील या अनधिकृत वाहनतळांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली
नाशिक : कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, आता पंचवटीसह शहर परिसर पूर्वपदावर आले असल्याने विविध भागांत भाजीपाला, उसाचे चिपाड, फेकलेले पदार्थ असे खाद्य मिळू लागल्याने पुन्हा शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढल्याने वाहनचालकांना या मोकाट जनावरांचा अडथळा होऊ लागला आहे.
सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे
नाशिक: मुंबई नाका ते आडगाव नाका या भागातील दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. त्यात वाहन आदळून किंवा खड्डा चुकवताना अन्य वाहनाला धडकल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी सातत्याने होत असूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे .
द्वारकाच्या सिग्नलवर कोंडी
नाशिक :द्वारका चौकात पुन्हा सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील भुयारी मार्गातून पादचाऱ्यांना जाणे बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. पादचारी, दुचाकी, रिक्षा अशा वाहनचालकांची कोंडी होऊन दुचाकीचालकांमुळे चारचाकी वाहनधारकांचीदेखील तारांबळ उडते. चौकात वाहतूक पोलीस उभे असूनही पादचारी भुयारी मार्गाचा उपयोग करताना दिसत नाहीत.