दमदार पावसामुळे खतांना वाढली मागणी
By Admin | Updated: July 25, 2014 00:39 IST2014-07-24T23:05:51+5:302014-07-25T00:39:37+5:30
दमदार पावसामुळे खतांना वाढली मागणी

दमदार पावसामुळे खतांना वाढली मागणी
नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, रासायनिक खते व बियाण्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात ६६ हजार ६७२ मेट्रिक टन रासायनिक खतांची व १७ हजार ८६७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याचे वृत्त आहे.
खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्याला २ लाख ५५ हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी नोेंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी २ लाख ४ हजार ७०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. रब्बीसाठी मंजूर झालेल्या एकूण खतांपैकी २८ हजार ५६८ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक होता. यावर्षीचा खरिपाचा मंजूर झालेला खतांचा साठा मिळून एकूण ९९ हजार ५६८ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असून, त्यापैकी ६६ हजार ६७२ मेट्रिक टन खतांची विक्री २४ जुलैअखेर झाली आहे. त्याचप्रमाणे खरिपासाठी एकूण मंजूर झालेल्या बियाण्यांपैकी खासगी दुकानांतून १२ हजार ४७७ क्विंटल, तर एकूण १७ हजार ८६७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, त्यामुळे रासायनिक खत व बियाण्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)