दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने नाशिक जिल्ह्यात बाजरीचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:38 AM2018-10-19T11:38:50+5:302018-10-19T11:41:55+5:30

बाजारगप्पा : आवकपेक्षा मागणी  वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या सप्ताहात बाजरीच्या भावात वाढ झाली आहे.

Increased demand from the drought-hit region has resulted in increased prices of bajara in Nashik district | दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने नाशिक जिल्ह्यात बाजरीचे भाव वाढले

दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने नाशिक जिल्ह्यात बाजरीचे भाव वाढले

Next

- संजय दुनबळे (नाशिक)

आवकपेक्षा मागणी  वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या सप्ताहात बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. मागील सप्ताहात १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असलेली बाजरी या सप्ताहात १८७५ ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. किरकोळ बाजारात २२ ते २४ रुपये किलोने बाजरी विकली जात आहे. दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने बाजरीचे दर तेजीत आल्याचे दिसून आले. मका, सोयाबीनच्या बाजारातही थोड्याफार प्रमाणात तेजी आली.

लासलगाव बाजार समितीत २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तर मालेगाव बाजार समितीमध्ये हजार ते बाराशे पोत्यांची दरदिवशीची आवक होऊन दर १८७५ ते २००० पर्यंत गेले. सध्या लातूर, नगर भागातून बाजरीला मागणी वाढल्याने येथील बहुसंख्य माल तिकडे जात असल्याने भावात वाढ झाली असल्याचे येथील भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले. मालेगाव बाजार समितीत स्थानिक आवक कमी असली तरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भागातील शेतमाल येथे येत आहे. नांदगाव बाजार समितीतही बाजरीची हीच स्थिती आहे. 

खरिपातील बाजरी काढण्यास शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी सुरुवात केली असली तरी मक्याच्या काढणीस मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली नाही. यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक कमीच आहे. सणासुदीचे दिवस आणि कांदा लागवडीचा हंगाम यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप मका काढलेला नाही. लासलगावी मक्याला सध्या १४५२ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. गत सप्ताहात लासलगावला मक्याची ३३३१ क्विंटल आवक झाली. भाव १२०० ते १४६० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. नांदगाव बाजारात मक्याची आवक वाढली असून, येथे भावही चांगला मिळला. लासलगावी सोयाबीनला ३३१५ ते ३२९० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत दर कमी झाल्याचे जाणवले.

नांदगाव, मालेगाव येथे सोयाबीनची फारशी आवक नाही. सटाणा बाजार समितीत भुसार मालाची आवक वाढली आहे. येथे बाजरीला १४७५ ते २०१६ सरासरी १७४० रुपये प्रतिक्विंटल तर मक्याला ११०० ते १४२२ सरासरी १२५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. सटाण्यात गव्हाला १९१० ते २३४४ सरासरी २०६० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नांदगाव बाजार समितीत मागील आठवड्यात मुगाची आवक बऱ्यापैकी होती. या आठवड्यात मात्र आवक खूपच कमी झाली. मुगाला ४३११ ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात मुगाची २९३ क्विंटल आवक झाली. मुगाला येथे ३००० ते ६३९५ सरासरी ५८५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दरम्यान, पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या पालखेड उपबाजार आवारात दसऱ्याच्या मुहूर्तावर धान्य लिलावाचा शुभारंभ झाला, तर चांदवडातही पुढील आठवड्यात भुसार मालाचे लिलाव सुरू करणार आहेत.

Web Title: Increased demand from the drought-hit region has resulted in increased prices of bajara in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.