निसर्गनगरमध्ये लुटीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 22:41 IST2016-05-22T22:40:36+5:302016-05-22T22:41:52+5:30

अंधाराचा फायदा : मद्यपींचा सुळसुळाट, पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

Increase in robbery cases in nature | निसर्गनगरमध्ये लुटीच्या घटनांमध्ये वाढ

निसर्गनगरमध्ये लुटीच्या घटनांमध्ये वाढ

पंचवटी : दिंडोरी रोडवरील कलानगर, निसर्गनगर, शिवगंगानगर परिसरातील मोकळ्या भूखंडांवर रात्रीच्या सुमारास टवाळखोर युवक खुलेआम मद्यपान करत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या युवकांकडून महिला व मुलींची छेडछाड काढली जात असून, रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत़ अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, पोलीस गस्तीची मागणी केली जात आहे़
दिंडोरी रोडवरील कलानगरच्या पुढे निसर्गनगर व शिवगंगानगर समोरासमोर आहे़ या परिसरात अनेक मोकळे भूखंड असून, त्यांचा वापर टोळक्यांकडून मद्यपानासाठी केला जातो़ या ठिकाणच्या मोकळ्या जागांना अक्षरश: खुल्या बिअरबारचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ विशेष म्हणजे या ठिकाणी बसलेल्या युवकांना नागरिकांनी टोकल्यास ते शिवीगाळ करून धमक्याही देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ तसेच या टोळक्यांमध्ये बहुतांशी गुन्हेगारी टोळक्यांशी संबंधित असल्याचे नागरिक सांगतात़
महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शिवगंगानगरमधील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोतही दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती़ या परिसरात पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी पूर्णत: अंधार असतो़ या वेळात दुचाकीवर जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची लूट केल्याची घटना अवघ्या आठवड्यापूर्वी घडली होती़ पोलिसांनी निसर्गनगर, शिवगंगानगरमध्ये मद्यपान करण्यासाठी येणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे़
रात्रीच्या वेळी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी, तसेच मद्यपान करणारे, छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेकडो त्रस्त नागरिकांनी केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Increase in robbery cases in nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.