भंगार दुकानांमुळे प्रदूषणात वाढ
By Admin | Updated: October 24, 2015 22:01 IST2015-10-24T21:59:18+5:302015-10-24T22:01:51+5:30
वडाळा परिसर : हरितपट्ट्यातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

भंगार दुकानांमुळे प्रदूषणात वाढ
इंदिरानगर : सातपूर येथील अंबड लिंकरोडप्रमाणेच वडाळा गावात भंगार दुकानांची संख्या वाढली असून, रात्रीच्या वेळी भंगार वितळविणे आणि त्यापासून धातू मिळवण्याच्या प्रकारामुळे या भागात प्रदूषण वाढू लागले आहे. विशेष म्हणजे हरितपट्ट्यात ही दुकाने फोफावत असताना महापालिकेचे प्रशासन मात्र स्वस्थ बसले असून, आता अंबड लिंकरोडप्रमाणे समस्या जटिल होण्याची वाट बघणार काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला
आहे.
वडाळागाव हे आजूबाजूच्या शेती शिवाराने घेरलेले असले तरी, अनेक भागांत आता इमारती उभ्या रहिल्या आहेत. यापूर्वी या भागात द्राक्ष आणि फुलशेती असल्याने हा भाग हिरवागार दिसत होता. आता अनेक ठिकाणी प्लॉट पडले असले तरी, अजून काही प्रमाणात शेती शिल्लक आहे. त्यात काही ठिकाणी पिके घेतली जातात, परंतु उर्वरित हरितपट्ट्यात भंगार बाजार सुरू झाला आहे. सुरुवातील दोन ते चार दुकाने याठिकाणी होती. मात्र, आता गेल्या काही वर्षांत दुकानांची संख्या वाढत असून, सध्या पंचवीस ते तीस दुकाने आहेत.
या दुकानांमध्ये भंगार आणणाऱ्या आणि नेणाऱ्या मालमोटारींची ये-जा नेहमीच असते. त्यामुळे रहिवासी भागातील ही वाहतूक आसपासच्या नागरिकांना त्रासदायक होते आहे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे परिसरात प्रदूषण वाढत आहे. रात्री-बेरात्री याठिकाणी भंगार साहित्य वितळवण्यासाठी रसायनांचा वापर करणे यासारखे प्रकार होत असून, त्यातून धातू काढले जातात. यामुळे परिसरात धूर आणि उग्र दर्प पसरतो. रात्रीच्या वेळी परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे.
केवळ प्रदूषण नाही, तर परिसरात अन्य समस्याही वाढल्या आहेत. मध्यंतरी या दुकानांपैकी काही दुकानदारांकडे जाऊन रेल्वेचे रुळ जप्त केले होते. त्यामुळे चोरी करणारे अनेक जण या भागात येऊन भंगारात यासारख्या वस्तू विकत आहेत. साहजिकच नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.(वार्ताहर)
अंबड लिंकरोड : प्रशासनाचा काणाडोळा
सातपूर-अंबड लिंकरोडवर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अशाच प्रकारे भंगार बाजार फोफावला. या भागात सुरुवातील आठ-दहा दुकाने होती, ती संख्या आता वाढून सातशेच्या वर गेली आहे. सर्व दुकाने बेकायदेशीर असून, नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो; परंतु महापालिकेला कारवाईसाठी विलंबाने जाग आल्याने आता न्यायालयाने आदेश देऊनही दुकाने हटता हटत नाही, अशी अवस्था आहे. आता अशीच अवस्था वडाळागावात होण्याची शक्यता आहे.