पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर्सची संख्या वाढविणार

By Admin | Updated: July 16, 2017 00:12 IST2017-07-16T00:11:58+5:302017-07-16T00:12:12+5:30

नाशिक : शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला

To increase the number of chambers to become water drain | पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर्सची संख्या वाढविणार

पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर्सची संख्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शुक्रवारी (दि.१४) शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून, काही ठिकाणी दुभाजकांचीही उंची कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले.  शुक्रवारी शहरात झालेल्या पावसाने पुन्हा एकदा नाशिककरांची दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले. त्र्यंबकरोडवरील सावरकर जलतरण तलावाबाहेर तर पाण्याचा आणखी एक तलावच तयार झाला होता, तर सातपूर विभागीय कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शिवसेनेने ‘फडणवीस वॉटर पार्क’ असे संबोधित उपरोधिक आंदोलन केले होते. या साऱ्या प्रकाराबाबत शहर अभियंता उत्तम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर महापालिकेने प्रभागनिहाय नेमलेल्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी चेंबरमधील घाण-कचरा हटविण्याचे काम केले.   १६९ ठिकाणी १३३ कर्मचारी व १४ जेसीबी व १५ ट्रॅक्टरच्या मदतीने विविध स्वरूपाची कामे करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, चेंबरवर अडकलेली घाण हटविणे, ढापे उघडून पाण्याचा निचरा करणे, चोकअप काढणे, संरक्षित भिंतींना छिद्र पाडून पाण्याचा निचरा करणे, दुभाजकही कट करून पाण्याला वाट मोकळी करून देणे आदी कामांचा समावेश होता. पावसाचे पाणी साचणाऱ्या भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून, प्रामुख्याने, पाण्याचा निचरा करणारे कॅचपीट अर्थात चेंबर्सची संख्या वाढविली जाणार आहे. दुभाजकांची उंची कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Web Title: To increase the number of chambers to become water drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.