दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ

By Admin | Updated: September 2, 2014 01:12 IST2014-09-01T22:46:03+5:302014-09-02T01:12:52+5:30

दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ

Increase in ground water level during datali-skull | दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ

दातली-खोपडीदरम्यान भूजल पातळीत वाढ


सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील खोपडी ग्रामपंचायतीच्या वतीने देवनदीवरील ब्रिटिशकालीन पूरचारीची स्वच्छता केल्याने या शिवारात पाणी आले असून, त्यामुळे दातली ते खोपडीदरम्यानच्या शिवारातील भूजलपातळीत वाढ झाल्याची माहिती खोपडीच्या सरपंच अंकिता भास्कर गुरुळे यांनी
दिली.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देवनदीच्या उगम क्षेत्रात मध्यंतरी झालेल्या संततधारेमुळे कोनांबे धरण ओसंडून वाहू लागल्याने देवनदीला पाणी आले आहे. या नदीवर ब्रिटिशकालीन बंधारे बांधण्यात आले असून, त्यावरून पूरचाऱ्या काढण्यात आलेल्या आहेत. सदर गावपाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. त्यात काटेरी झुडपे, खुरट्या वनस्पतींनी वेढला होता तर अनेक ठिकाणी तो बुजला होता. मात्र, हा गावपाट दुरुस्त करून प्रवाहित केल्यास पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो, या विचारातून गुरुळे यांनी ग्रामनिधीतून दातलीपासून ते खोपडी बुद्रुक येथील पाझरतलावापर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे यंदा देवनदीला पाणी येताच या पूर कालव्याला पाणी वळवून कालवा प्रवाहित करण्यात आला. त्यामुळे शहापूर, खोपडी शिवारात कालव्याचे पाणी फिरल्यामुळे दोन्ही गावांच्या शिवारातील विहिरींच्या, तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदाही पूर्वभागात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने बंधारे, पाझरतलाव, नालाबंडिंग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. अन्य गावांमध्ये अद्यापही पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. यंदा पावसाळ्याचे तब्बल दोन महिने उलटून गेले आहेत; परंतु पूर्व भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदा उशिरा का होईना पश्चिम पट्ट्यातील देवनदीच्या उगमस्थानावर चांगला पाऊस झाल्याने देवनदीला पाणी आले आहे. या नदीवर ब्रिटिशकालीन ३२ बंधारे आहेत. त्यावरून पूरपाण्यासाठी कालवे काढण्यात आले असून, देवनदीला पूरपाणी आल्यावर त्या कालव्यातून शिवारात पाणी सोडण्यात येते. यंदा कुंदेवाडी जवळील बंधारा भरल्याने त्यावरील पूरचारी प्रवाहित झाली आहे. तसेच खोपडी ग्रामपंचायतीने दुरुस्ती केल्याने दातलीजवळील बंधाऱ्यातून खोपडीला पाणी सुरू झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांना त्याचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Increase in ground water level during datali-skull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.