मुक्त विद्यापीठातील असमन्वय चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:33+5:302021-09-13T04:14:33+5:30

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी घसरला असताना या मुद्द्यावरून विद्यापीठातील ...

Inconsistency at the Open University | मुक्त विद्यापीठातील असमन्वय चव्हाट्यावर

मुक्त विद्यापीठातील असमन्वय चव्हाट्यावर

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेशाचा आलेख यावर्षी घसरला असताना या मुद्द्यावरून विद्यापीठातील नाशिक विभागीय केंद्र संचालक आणि जनसंपर्क विभागातील असमन्वय चव्हाट्यावर आला आहे. नाशिक विभागीय केंद्र संचालकांनी विद्यापीठातील जनसंपर्क विभागाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता माध्यमांना प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती दिल्याचा आरोप जनसंपर्क विभागाकडून करण्यात आला आहे.

मुक्त विद्यापीठात मागील काही वर्षात कृषी अभ्यासक्रमांची मान्यता रद्द झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशात झालेल्या घसरणीमुळे विद्यापीठ टिकेचे लक्ष झालेले असताना आता विद्यापीठातील वेगवेगळ्या विभांगामधील असमन्वय आणि मतभेद समोर येऊ लागले आहेत. यात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेविषयी नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने व कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीतून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी विद्यापीठात आणि विभागीय केंद्रातील विद्यार्थी प्रवेशात घट झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे विद्यापीठ आणि विभागीय केंद्रातील अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इन्फो-

विभागीय केंद्राने अशा प्रकारे पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती कुलसचिव अथवा जनसंपर्क कार्यालयाला कोणतीही पूर्व कल्पना दिली नसल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. विभागीय केंद्राला संपूर्ण माहिती नसल्याचा खुलासा करतानाच मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरपर्यंत ७० ते ७५ हजार प्रवेशांची तफावत असल्याचे मान्य केले आहे. परंतु, अशा प्रकारे विभागीय केंद्राने माहिती देणे चुकीचे असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Inconsistency at the Open University