वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:30+5:302021-07-22T04:10:30+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळल्याने पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या ...

वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळला
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळल्याने पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यातील अटकवाडे येथे यंदा साठवण तलावाचे काम करण्यात आले. परंतु हे काम यावर्षी पूर्ण न झाल्याने ते अपूर्ण राहिले. परंतु त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात संततधार व मुसळधार पाऊस झाल्याने येथील अडविलेल्या नदीस मोठ्या प्रमाणात पूर आला आणि दोन्ही बाजूचे कठडे व बांध भराव पावसामुळे निखळल्याने धरणाच्या खालील बाजूस वटकपाडा येथील शेतकऱ्यांनी लावलेली रोपे त्या मातीच्या भरावाखाली गाडून गेली आहेत. बाकीची रोपे ही पाण्याने वाहून गेली आहेत. सुरुवातीला जमिनीवर लावणी करण्यात आलेली भात, नागली, वरी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी पेरलेल्या उडीदाचे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी हे पूर्णपणे कोरडवाहू शेती करीत असून यापुढे त्यांना त्याच जागेत पुन्हा पिके घेता येणार नाहीत. संतोष गरेल, हरिदास गभाले, भावडू गभाले, रामा गभाले, पांडुरंग गभाले, शंकर गभाले, गोपाळा गभाले, भिका लाखन, हिरामण गरेल व भाऊ तुबडे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
नुकसानीस जबाबदार कोण?
वटकपाडा येथील साठवण धरणाचे काम हे मक्तेदार यांनी याचवर्षी जर पूर्ण केले असते तर आमच्या वर्षभराच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले नसते. आता झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने किंवा मक्तेदार यांनी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जलपरिषेदेचे अनिल बोरसे व पोपट महाले यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे करून या गरीब शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
--------------------
साठवण बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान (छाया-सुनिल बोडके) (२१ वेळूंजे १/२)
210721\21nsk_4_21072021_13.jpg
२१ वेळूंजे १/२