विद्यार्थ्यांमार्फत करा मिळकतींचे सर्वेक्षण
By Admin | Updated: December 5, 2015 23:32 IST2015-12-05T23:32:06+5:302015-12-05T23:32:58+5:30
देवयानी फरांदे : ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यासाठी सूचना

विद्यार्थ्यांमार्फत करा मिळकतींचे सर्वेक्षण
नाशिक : घरपट्टीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, परंतु सदर सर्वेक्षण खासगी एजन्सीमार्फत न करता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचे काम दिल्यास अनेकांना शिक्षण घेता घेता रोजगारही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूचना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेला केली आहे. याशिवाय, ‘स्मार्ट सिटी’साठी विविध सूचनाही फरांदे यांनी केल्या आहेत.
शहरात महापालिका हद्दीत सुमारे ३ लाख ९२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत, परंतु अनेक वर्षांत बऱ्याच मालमत्तांचे मूल्यमापनच झालेले नसल्याचे अथवा अगोदरच्या बांधकाम नकाशात काही बदल केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने येत्या काही महिन्यांत घरोघरी जाऊन मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे की, महापालिकेने यापूर्वी अनेक कामांचे सर्वेक्षण एजन्सीमार्फत केले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्चही केला आहे, परंतु या एजन्सीचा चांगला अनुभव महापालिकेला आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील महाविद्यालये, वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यामधील विद्यार्थ्यांचा समूह करून त्यांना विभाग वाटून द्यावे. त्यांच्यामार्फत मिळकतींचे सर्वेक्षण करावे. याशिवाय जाहिरात कराच्या माध्यमातूनही महापालिकेला पाच वर्षांत सुमारे ६६ कोटींपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी जाहिरात कर वसुलीच्या खासगीकरणाचीही सूचना फरांदे यांनी केली. महापालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाला मात्र फरांदे यांनी विरोध दर्शविला आहे. खासगीकरणाऐवजी शहरातील सामाजिक संस्थांना शाळा दत्तक देण्याची संकल्पना फरांदे यांनी मांडली आहे. वायफायमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळू शकते. त्यातून पॅनसिटीची योजना राबविणे सोपे होईल. स्मार्ट अॅप्समध्ये सर्व सुविधांचा समावेश करण्याची सूचनाही फरांदे यांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)