निवडणूक खर्चावर आयकरची नजर
By Admin | Updated: January 20, 2017 01:24 IST2017-01-20T01:24:06+5:302017-01-20T01:24:23+5:30
निरीक्षक नियुक्त : आयोगाकडून पहिल्यांदाच प्रयोग

निवडणूक खर्चावर आयकरची नजर
नाशिक : निवडणूक काळात प्रचंड प्रमाणात होणारा पैशांचा वापर रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर थेट आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वॉच ठेवण्याचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने त्यासाठी आयकर खात्यातील पाच अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे, उमेदवार आता थेट आयकर खात्याच्या कचाट्यात सापडणार आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रक समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर होत असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच आयकर खात्याच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती करत वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील दहाही महापालिकांच्या निवडणुकीसाठी े पथक नियुक्त केले आहे. त्यात नाशिक महापालिकेसाठी आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकारी धुळे येथील बी. एस. झाला, मालेगाव येथील संजयकुमार सिंग, औरंगाबाद येथील अनिमेश नासकर, जळगाव येथील एस. एच. मेंढे, औरंगाबाद येथील मनीषकुमार सोनी यांचा समावेश आहे. सदर निरीक्षक उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवणार असून, बॅँक उलाढालीवरही त्यांचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)