‘अशोका बिल्डकॉन’वर आयकर खात्याचा छापा

By Admin | Updated: April 5, 2016 23:56 IST2016-04-05T23:55:29+5:302016-04-05T23:56:37+5:30

तीन पथकांची कारवाई : कार्यालय, निवासस्थान, टोलनाक्याची झडती

Income Tax Department raids 'Ashoka Buildcon' | ‘अशोका बिल्डकॉन’वर आयकर खात्याचा छापा

‘अशोका बिल्डकॉन’वर आयकर खात्याचा छापा

 नाशिक : शहरातील बांधकाम व्यावसायिक व अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका या तीन ठिकाणी आयकर विभागाने मंगळवारी (दि़ ५) सकाळी एकाच वेळी छापे टाकले़ गत महिन्यात नाशिकमध्ये आलेले भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी कटारिया यांच्यावर आरोप केला होता़ त्या पार्श्वभूमीवर इडी व आयटीने छापे मारल्याचे वृत्त शहरात दिवसभर पसरले होते, प्रत्यक्षात ईडीचा या छाप्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास अशोका मार्गावरील अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे कार्यालय, संचालक अशोक कटारिया यांचे गंगापूर रोडवरील दत्त चौकातील ‘अंशुमान’ व पिंपळगाव बसवंतजवळील ‘पीएनजी टोलवे’ या तीन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला़ या छाप्यामध्ये या अधिकाऱ्यांनी अशोका बिल्डकॉनने केलेली कामे त्यासाठीचे पैशांचे व्यवहार आदिंबाबतच्या फाईल्स व रेकॉर्ड तपासल्याचे वृत्त आहे़ यातील प्रत्येक पथकामध्ये सात ते आठ कर्मचाऱ्यांचा समावेश होता़ सकाळपासून सुरू झालेले चौकशीचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते़ त्यापैकी पीएनजी टोलवेचे काम लवकर संपले तर कटारिया यांचे निवासस्थान व कार्यालय येथील काम उशिरापर्यंत सुरू होते़ तसेच कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती वा त्यांची मदतही घेण्यात आली नव्हती़
खा. किरीट सोमय्या यांनी मात्र, तपास यंत्रणांकडे मी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालय व प्राप्तीकर विभागाची संयुक्त बैठक होवून हा छापा टाकण्यात आला आहे. कारवाई सुरू असल्यामुळे याबाबत बोलणे उचित होणार नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Income Tax Department raids 'Ashoka Buildcon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.