कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना
By Admin | Updated: November 10, 2014 00:53 IST2014-11-10T00:53:19+5:302014-11-10T00:53:46+5:30
कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना

कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना
नाशिक : शिवाजीनगर येथील सराफ व्यावसायिकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत कार व दुचाकीवरील इसमांनी दोन लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील चव्हाणनगर येथे राहणारे मनोहर बाबूराव कुमावत (४२) यांचे शिवाजीनगरमध्ये सराफी दुकान आहे़ शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कुमावत आपल्या कारागिरासह सातपूर औद्योगिक वसाहतीतील स्नायडर कंपनीजवळून स्कूटरवर जात होते़ यावेळी पाठीमागून आलेल्या आयकॉन फोर्ड कारने (एमएच १२, व्हीव्ही-५७८६) व यामाहा दुचाकीने (एमएच १५ ईडी-५८७२) ने पाठीमागून जोरात धडक दिली़ या धडकेत कुमावत व त्यांचा कारागीर हे दोघेही खाली पडले़ यानंतर कार व दुचाकीवरील इसमांनी संगनमत करून चाकूचा धाक दाखवित कुमावत यांची दागिन्यांची बॅग लुटून नेली़ यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते़
चोरट्यांना चोरून नेलेल्या बॅगेमध्ये ३० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी २० ते २५ ग्रॅम वजन असलेल्या दोन किलो चांदीच्या व मिश्र धातूच्या १०० पट्ट्या, ३० हजार रुपये कि मतीचे प्रत्येकी १० ते ५० ग्रॅम वजन असलेले दोन किलो चांदीमिश्र धातूचे ७० नग जोडवे व अंगठ्या, एक लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ६० मणी,
जुन्या दुरुस्तीच्या वस्तू, एक सोन्याची अंगठी, बुगडी, टॉप्स असे एकूण १५ ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण एक लाख ९२ हजारांचा ऐवज होता़
या प्रकरणी सातपूर पोलिसांनी वैभव परदेशी, हेमंत भदाणे, धनराज पवार, किशोर सिरसाठ या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे़ (प्रतिनिधी)