‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच् उद्घाटन
By Admin | Updated: April 5, 2015 00:56 IST2015-04-05T00:52:49+5:302015-04-05T00:56:10+5:30
‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच् उद्घाटन

‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच् उद्घाटन
नाशिक : खासदार असल्याने देशाच्या विविध राज्यांतील महिलांशी संपर्क येतो. त्यांत महाराष्ट्रातील महिला सर्वाधिक पुरोगामी असल्याचे जाणवते; मात्र जोपर्यंत महिलांना समानतेची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत देश प्रगतीकडे जाणार नाही, असे मत भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे-खाडे यांनी व्यक्त केले. लायन्स क्लब इंटरनॅशनच्या वतीने आयोजित ‘त्रिवेणी’ या प्रांतीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या ‘महिला व सामाजिकता’ या विषयावर बोलत होत्या. क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, नरेंद्र भंडारी, प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल विनोद कपूर, उपप्रांतपाल चंद्रहास शेट्टी, श्रीकांत सोनी, नीलिमा जाधव आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुंडे-खाडे म्हणाल्या की, आपल्या देशात महिलांना देवी, शक्तीचे रूप मानले जाते; मात्र पुरुष व महिला यांच्यातील भेदभाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. दोन्हींमधील समानता माणसांच्या वागण्यातून जाणवायला हवी. महिलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असते आणि ती त्या आई, पत्नी, बहीण या भूमिकेतून सभोवतालच्या माणसांतही रुजवतात. सरकारने महिलांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम वेगात सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रारंभी छायाचित्र, स्क्रॅप बुक व कॉफी बुक स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर धन्वंतरी पूजन करण्यात आले. ‘वेणुनाद’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या चाळीस बालकांनी बासरीवादन सादर केले. वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रास्ताविकात क्लबच्या कार्याची माहिती दिली. योगेश कदम यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते. उद्या (दि. ५) सकाळी ९ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ग्रीन व्ह्यू हॉटेलपर्यंत फेरी काढण्यात येणार आहे.
दरम्यान, कार्यक्रम एक तास उशिरा सुरू झाल्यानंतरही भाषणे लांबल्याचे पाहून प्रीतम मुंडे-खाडे यांनी वक्त्यांना टोला लगावला. आपल्या आधीच्या वक्त्यांनी ‘फार वेळ घेणार नाही’ असे सांगत बरीच लांबलचक भाषणे केली. माइक हाती आल्यानंतर अनेकांना तो सोडवत नाही. आपण मात्र तसे करणार नाही. कारण वक्तृत्व हा आपला प्रांत नसल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)