शिक्षिकेच्या बालविश्व ब्लॉगचे उद्घाटन

By Admin | Updated: September 26, 2016 00:23 IST2016-09-26T00:23:25+5:302016-09-26T00:23:46+5:30

हाताणे : जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम

The inauguration of the educator's childhood blog | शिक्षिकेच्या बालविश्व ब्लॉगचे उद्घाटन

शिक्षिकेच्या बालविश्व ब्लॉगचे उद्घाटन

संतोष कांबळे : वडेल
तालुक्यातील प्राथमिक शाळांचे स्वरुप ई-लर्निंग प्रणाली व डिजिटलायझेशनमुळे दिवसेंदिवस बदलत असून आता यामध्ये प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या ब्लॉगची भर पडत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाताणे येथील शिक्षक वैशाली बाळासाहेब भामरे यांनी नुकताच बालविश्व हा ब्लॉग तयार केला. ब्लॉगचे औपचारिक उद्घाटन नाशिक येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजीमंत्री जयंत पाटील, जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंभळे, श्रीराम शेटे आदि उपस्थित होते.
तालुक्यात यापूर्वी कळवाडी केंद्राची वेबसाइट तयार करण्यात आली. प्रवीण शिंदे, किरण केदार, भरत पाटील आदि तंत्रस्नेही शिक्षकांनी स्वत:चे ब्लॉग तयार केले आहेत. आता वैशाली भामरे यांच्या रुपाने तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकही मागे नाहीत याची प्रचिती आली आहे. या ब्लॉगवर आधुनिक व नवनवीन माहिती उपलब्ध असून हाताणे शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांसह विद्यार्थी प्रगतीच्या नवनवीन संकल्पनाही येथे पहावयास मिळतात. हाताणे येथे कार्यरत असलेले भामरे यांचे पती योगेश शेवाळे यांच्या सहकार्याने बनविलेल्या या ब्लॉगवर शैक्षणिक वार्ता तालुक्यातील विविध ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सचित्र माहिती तसेच तालुक्यातील साहित्य, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या विविध व्यक्तींचा परिचयही आपणास मिळतो.
या ब्लॉगमुळे एकाच क्लिकवर तालुक्याची सर्वांगीण माहिती उपलब्ध होत असून वैशाली भामरे यांनी तंत्रस्नेही शिक्षणाच्या क्षेत्रात ब्लॉगनिर्मिती करुन मोलाची भर टाकली आहे. यापूर्वीही वैशाली भामरे यांनी शाळेत शंभर टक्के उपस्थिती टिकावी यासाठी विविध उपक्रम राबविले असून, पर्यावरण संरक्षणासाठी झाडांना दत्तक देण्याचा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या उपक्रमांमुळे शाळेच्या लौकिकात भर पडत आहे.
 

Web Title: The inauguration of the educator's childhood blog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.