राबणाऱ्या हातांची मागविली माहिती
By Admin | Updated: September 21, 2015 23:46 IST2015-09-21T23:46:09+5:302015-09-21T23:46:31+5:30
दखल : कुंभमेळ्यात काम करणाऱ्यांना मिळणार गौरवपत्र

राबणाऱ्या हातांची मागविली माहिती
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचे धनुष्य पेलताना कार्यालयातील शिपायापासून ते लिपिक व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी स्वत:ला झोकून दिल्यामुळेच तो यशस्वी होऊ शकल्याची जाणीव ठेवून कुंभमेळ्याशी निगडित कामे केलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासाठी सर्व शासकीय कार्यालयांकडून कुंभमेळ्याशी निगडित कामे केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली असून, कर्मचाऱ्याचे नाव व त्याने बजावलेल्या कामगिरीची माहिती गोळा केली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात जिल्हाधिकारी कार्यालयासह, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, आरोग्य, पाटबंधारे, वीज, एस. टी. महामंडळ, दूरसंचार, त्र्यंबक नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरातत्व, पर्यटन महामंडळ, वन विभाग अशा जवळपास २१ यंत्रणांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सुमारे २३०० कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यानुसार प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यालयाशी संबंधित कामे केली एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष पर्वणीच्या काळात सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्थेकामी नेमणूक करण्यात आली होती. पर्वणीच्या आदल्या दिवसापासून ते पर्वणीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत साधारणत: ६० ते ७२ तास सलग त्यांनी कामे केली. काहींना सेक्टर अधिकारी तर काहींना सब सेक्टर म्हणून नेमणुका देतानाच शिपायांनादेखील अशा कार्यालयांवर नेमण्यात आले होते. (प्रतिनिधी)