वीजपुरवठ्यात सुधारणा करा
By Admin | Updated: January 11, 2017 22:37 IST2017-01-11T22:37:38+5:302017-01-11T22:37:58+5:30
बावनकुळे : राजाभाऊ वाजे यांच्यासह शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक

वीजपुरवठ्यात सुधारणा करा
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात वावी व पाथरे उपकेंद्रातून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यासंदर्भात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेतली. अधिकाऱ्यांनी आमदार राजाभाऊ वाजे व शेतकऱ्यांना सोबत घेऊन पूर्व भागातील विजेच्या समस्यांची पाहणी करावी व वीजपुरवठा त्वरित सुरळीत करून देण्याचे आदेश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. पूर्व भागातील वावी व पाथरे अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना अनियमित दाबाने व वारंवार खंडित वीजपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने, निदर्शने, रास्ता रोको केले. मात्र अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेऊन वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन ऊर्जामंत्र्यांना दिले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे नाशिक मंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. कुमठेकर व ट्रान्समिशनचे मुख्य अभियंता यांनी एकत्र येऊन वाजे व संबंधित शेतकऱ्यांसोबत पूर्व भागाची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ऊर्जा मंत्रालयाकडे सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गोकुळ नरोडे, सिन्नर औद्योगिक वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, दशरथ हांडोरे, रोशन गडाख, श्याम कासार, पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, गणेश जाधव, कारवाडीचे सरपंच साहेबराव जाधव, रामपूरचे सरपंच ज्ञानेश्वर ढेंगळे, भरतपूरचे सरपंच भाऊलाल कारले, नवनाथ वाक्चौरे, शिवनाथ जाधव, खरेदी-विक्री संघाचे संचालक आर. आर. जाधव, प्रशांत कुलकर्णी, सोमनाथ घोलप, हेमंत चिने, मनोज गवळी, संदीप गवांदे, भाऊसाहेब थोरात, काशीनाथ जाधव, काका नाजगड, नवनाथ जाधव, दत्तू आदिक, मारुती विघे, भाऊसाहेब विखे, दादासाहेब जाधव, वसंत जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)