नोटाबंदीचे मध्य प्रदेशमध्ये उत्स्फूर्त स्वागत
By Admin | Updated: January 2, 2017 23:22 IST2017-01-02T23:22:06+5:302017-01-02T23:22:25+5:30
शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब घेतले दर्शन

नोटाबंदीचे मध्य प्रदेशमध्ये उत्स्फूर्त स्वागत
त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मध्य प्रदेशमधील जनतेने भरभरून स्वागत केले असून, काळा पैसा हुडकण्यास सरकारला मदतच झाली आहे. जनतेला त्रास झाला; पण या निर्णयाशिवाय गत्यंतरही नव्हते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. मुख्यमंत्री चौहान त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. दर्शनविधी झाल्यानंतर ते म्हणाले, मध्य प्रदेशमध्ये कॅशलेस व्यवहार होत असून, जनता समाधानी व आनंदी आहे.
दरवर्षी जानेवारीत ते त्र्यंबकेश्वरी येत असतात. त्यांच्या पूजेचे पौरोहित्य पंडित वामनराव गायधनी, पराग धारणे, मंदिर पिंपरकर, बाळासाहेब कळमकर व गौरव धारणे आदि पुरोहितांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे प्रांताधिकारी आवर्जून उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपनिरीक्षक किरण मेहेर, कैलास आकुले, हवालदार रमेश पाटील, राजू दिवटे आदिंसह अनेक पोलीस हवालदार उपस्थित होते. भाजपाचे अॅड. गायधनींसह हर्षल भालेराव, संतोष भुजंग, उपेंद्र शिखरे, चेतन थेटे, विष्णू दोबाडे, विजू पुराणिक आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.