पाणीचोरीविरुद्ध पाटबंधारे खाते आक्रमक
By Admin | Updated: March 12, 2017 01:29 IST2017-03-12T01:29:23+5:302017-03-12T01:29:37+5:30
नाशिक : पालखेड पाटबंधारे कार्यालयांतर्गंत येणाऱ्या उर्ध्व गोदावरीच्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याची तयारी सुरू झाली आहे.

पाणीचोरीविरुद्ध पाटबंधारे खाते आक्रमक
नाशिक : पालखेड पाटबंधारे कार्यालयांतर्गंत येणाऱ्या उर्ध्व गोदावरीच्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याची तयारी सुरू झाली असून, पाणीवापर संस्थांसाठी सोडण्यात येणाऱ्या या पाण्याच्या संभाव्य चोरी विरुद्ध पाटबंधारे खात्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कालव्यातील पाणी चोरण्यासाठी डोंगळे टाकल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच जादा पाणी लागणाऱ्या पिकांना पाणी न देण्याचे तसेच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
ओझरखेड, पुणेगाव डावा कालवा तसेच ओझरखेड, तीसगाव व पुणेगाव धरणाच्या फुगवट्यातील परिसर, जांबुटके व खडकमाळेगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाणीवापर संस्थांसाठी उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्यात येणार असल्याने त्याच्या तयारीचा भाग म्हणून पाणीवापर संस्थांनी येत्या २० मार्चपर्यंत मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाने केले आहे. तथापि, यंदा पाण्याची उपलब्धता व मागणीचा विचार करता सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी पाटबंधारे खाते सक्रिय झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा कोणताही प्रकारे गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित पाणीवाटप संस्थांवर सोपविण्यात आली असून, ज्या पिकांना अधिक पाणी लागते अशा पिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने पिकांचे नुकसान झाल्यास पाटबंधारे खाते त्यास जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. ज्या संस्थांनी थकबाकी भरली असल्यास त्यांनाच पाणी दिले जाईल, शिवाय नादुरुस्त चाऱ्यांमधून पाणीपुरवठा केला जाणार नसल्याने पाणीवापर संस्थांनी चाऱ्या सुस्थितीत ठेवाव्यात, पाण्याचा अपव्यय झाल्यास त्याला पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही शिवाय ज्या पिकांसाठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे त्याच पिकासाठी पाण्याचा वापर व्हावा, मागणी न केलेल्या पिकासाठी पाण्याचा वापर केल्यास पाणीवापर अनधिकृत असल्याचे समजून पिकांचा पंचनामा केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कालव्यातून पाणी सोडल्यास इलेक्ट्रीक मोटारी अथवा आॅईल इंजिन ठेवून डोंगळ्याच्या माध्यमातून पाणी चोरीचा कोणी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यान्वये साहित्य जप्त करण्याचेही पाटबंधारे खात्याने ठरविले आहे.