गोदावरीतील सांडपाणी तत्काळ रोखा
By Admin | Updated: January 2, 2015 00:41 IST2015-01-02T00:34:12+5:302015-01-02T00:41:18+5:30
पालकमंत्री : सिंहस्थानंतर कायमस्वरूपी तोडगा

गोदावरीतील सांडपाणी तत्काळ रोखा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आलेला असताना कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक व भावनेचा प्रश्न असलेल्या गोदावरीचे प्रदूषण तत्काळ रोखतानाच त्यात सोडले जाणारे सांडपाणी युद्धपातळीवर बंद करा व सिंहस्थानंतर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनास दिले.
सिंंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. गोदावरीत सांडपाणी टाकले जात असतानाही प्रशासन पाण्याचे नमुने तपासून पाणी योग्य असल्याचे सांगितले जाते, जगातील कोट्यवधी भाविक गोदावरीचे पाणी पवित्र म्हणून तीर्थ प्राशन करतात. वास्तवात भाविकांच्या धार्मिक व भावनेचा या प्रश्नावर यापूर्वीच तोडगा काढायला हवा होता मात्र तसे झाले नसले तरी, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ युद्धपातळीवर येत्या दोन महिन्यांत गोदावरीत कोणत्याही परिस्थितीत सांडपाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश देऊन सिंहस्थानंतर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केली. साधुग्रामसाठी जमीन संपादन करण्याच्या प्रश्नावरही पालकमंत्र्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.