मारेकऱ्यांना तत्काळ जेरबंद करा
By Admin | Updated: January 24, 2016 22:37 IST2016-01-24T22:26:44+5:302016-01-24T22:37:30+5:30
मागणी : देवगाव येथील विद्यार्थिंनी मनोषा चोपडे खून प्रकरण

मारेकऱ्यांना तत्काळ जेरबंद करा
लासलगाव : देवगाव येथे ३० डिसेंबरला जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या विद्यार्थिनी मनीषा चोपडे हिच्या खुनातील दोषींना अटक करण्यात तिच्या मृत्यूच्या तब्बल पंचवीस दिवसांनंतरही पोलिसांना यश न आल्याने पोलिसांच्या बेपर्वाईचा निषेध करून सीआयडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी मृत मनीषाच्या वडिलांसह चौघे आमरण उपोषण करणार आहेत.
दुर्दैवी मनीषाचे वडील राजेंद्र शंकर चोपडे, बद्रीनाथ अरुण लोहारकर, धनंजय विनोद जोशी व संदीप बबन लोहारकर यांनी देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत
देवगाव येथे ग्रामस्थांनी पोलिसांच्या रेंगाळलेल्या तपासाच्या निषेधार्थ आणि संशयित मोकाट असल्याने घटनेचा सखोल तपास करण्यासाठी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रूपांतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभेत झाले. त्यात मृत विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत पोलिसांवर संताप व्यक्त करून तपासाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. शोकसभेत देवगावचे उपसरपंच विनोद जोशी यांनी पोलिसांवर आरोप करताना सांगितले की, मुलीचा खून झालेला असताना ते प्रकरण आत्महत्त्या केल्याचा देखावा पोलीस करत आहेत. घटनेच्या सूत्रधारांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली होती. शिवा सुराशे, धनंजय जोशी, प्रशांत कुलकर्णी, बद्रीनाथ लोहारकर, राजेंद्र मेमाने, वसंत अढांगळे यांनी पोलिसांना आवाहन केले की, घटनेचा तपास तटस्थपणे करावा. यावेळी भास्कर बोचरे, जगदीश लोहारकर, राजेंद्र चोपडे यांच्यासह गावातील दीड ते दोन हजार ग्रामस्थ सहभागी झाले होती.
६ जानेवारी रोजी भरवस फाटा येथे हजारो देवगाव येथील महीना पुरूष यांच्यासह कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, देवगावचे विनोद जोशी, संभाजी पवार यांच्यासह नेत्यांनी नेतृत्व करीत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी लवकरच आरोपींना गजाआड करू असे आश्वासनही दिले परंतु तपास ठप्प राहिला. त्यामुळे पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.