मनसेचे हवेत इमले

By Admin | Updated: June 7, 2014 01:46 IST2014-06-07T01:25:11+5:302014-06-07T01:46:16+5:30

स्थायी समितीचेच अंदाजपत्रक तब्बल तीन हजार कोटींवर गेले आहे.

Imla in the air of MNS | मनसेचे हवेत इमले

मनसेचे हवेत इमले

नाशिक : महापालिकेला अगोदरच उत्पन्न मिळवणे मुश्कील झाले असताना, स्थायी समितीने मात्र कोट्यवधी रुपये जमा होतील असा अंदाज दाखवत आयुक्तांचे अंदाजपत्रक एक हजार कोटी रुपयांनी फुगवले आहे. त्यामुळे यंदा स्थायी समितीचेच अंदाजपत्रक तब्बल तीन हजार कोटींवर गेले आहे. विरोधकांनी त्यावर मनसेची ही गंमत असल्याची खिल्ली उडवली आहे.
महापालिकेत मनसेची सत्ता असून, अर्धे वर्ष संपले तरी स्थायी समितीने अंदाजपत्रकच प्रशासनाकडे सादर केले नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी याबाबत टीका केल्यानंतर आज घाईघाईने स्थायी समितीचे अंदाजपत्रक लेखा विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु सदरचे अंदाजपत्रक विरोधकांच्या हाती लागल्यानंतर त्यातील धक्कादायक आकडेमोड समोर आली आहे. आयुक्तांनी स्थायी समितीला १९९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून ते तयार केले होते; परंतु प्रशासनाने जितकी रक्कम जमा दाखवली त्यापेक्षा कैकपटीने अधिक रक्कम जमा होईल असा दावा करीत स्थायी समितीने त्यावर आधारित खर्च बाजू दाखवली आहे. जी रक्कम जमाच होणार नाही ती जमा दाखवून त्यावर आधारित अंदाजपत्रक हास्यापद असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
कुंभमेळ्यासाठी शासनाकडून २५० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल असा अंदाज असताना, स्थायी समितीने ७१९ कोटी रुपये शासन देईल असा अंदाज दाखवला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची अंमलबजावणीच होऊ शकत नाही, असे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि शहर विकास आघाडीचे गटनेते गुरुमित बग्गा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Imla in the air of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.