नाशिक : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिकचे सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी, सरकारी यंत्रणा, महानगरपालिका आणि नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला मदत व्हावी या दृष्टीने नाशिक आयएमएने सर्व प्रकारची सज्जता ठेवली आहे. तसेच वेगवेगळ्या स्तरांवर आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी अभ्यासपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी सणासुदीच्या काळात विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी पत्रकार परिषदेत केले. येत्या आठवडाभरात हॅलो आयएमए ही कोविड हेल्पलाईन पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने आयएमएचे सभासद डॉक्टर्स बालरोगतज्ज्ञ संस्थेच्या साहाय्याने पालकांसाठी आणि लहान मुलांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम, प्रबोधन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. त्याशिवाय लसीकरण आणि त्यासंबंधी सर्व बाबींचा समावेश आयएमएच्या कार्यात होणार आहे. यावेळी डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. रिना राठी, डॉ. सारीका देवरे, डॉ. विशाल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
वृद्धाश्रमात लसीकरण
वुमन विंगच्या सदस्य डॉक्टरांच्या मार्फत आयएमए नाशिकने वृद्धाश्रमात राहणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली आहे. सहारा, दिलासा, विसावा, सामनगाव, वात्सल्य अशा आठ वृद्धाश्रमांतील ३०० पेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना मोफत लसीकरण करण्यात आल्याचे आयएमएच्या वुमन डॉक्टर विंग चेअर पर्सन डॉ. अनिता भामरे यांनी सांगितले.