अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

By Admin | Updated: August 25, 2015 23:57 IST2015-08-25T23:54:45+5:302015-08-25T23:57:50+5:30

मौन सोडले : ग्यानदास महाराजांचा नरमाईचा पवित्रा

I'm a president, but is not it? | अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

अध्यक्ष नसलो तरी महंत आहे ना?

नाशिक : भले मी आखाडा परिषदेचा अध्यक्ष नसलो, तरी निर्वाणी अनी आखाड्याचा महंत तर आहे ना, असा सवाल करीत श्री महंत ग्यानदास यांनी आज अखेर एक पाउल मागे घेतले. कुंभमेळ्यातील शाहीस्नान हे अध्यक्षाचे नव्हे, महंतांचेच असते. अध्यक्ष तर केवळ कामे करवून घेण्यासाठी असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडल्याने त्यांचा नरमाईचा पवित्रा अधोरेखित झाला.
गेल्या काही महिन्यांपासून श्री महंत ग्यानदास यांच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाड्यांनी त्यांना अध्यक्ष मानण्यास यापूर्वीच नकार दिला आहे, तर रविवारी वैष्णव पंथातील सर्वांत मोठ्या दिगंबर अनी आखाड्यानेही ग्यानदास यांचा पाठिंबा काढून घेतला. महंत ग्यानदास हे हुकूमशहाप्रमाणे वागत असून, साधू-संतांना अपमानित करीत आहेत. त्यांच्याकडून पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याने त्यांचे अध्यक्षपद अमान्य करीत असल्याची घोषणा दिगंबर आखाड्याने केली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून साधुग्राममध्ये तणावाचे वातावरण होते. दिगंबर आखाड्याकडून टीकास्र सोडले जात असताना, महंत ग्यानदास यांनी मात्र याबाबत मौन बाळगले होते. आज दुपारपर्यंत त्यांच्याशी कोणाचा संपर्क होऊ शकला नव्हता. ते त्रिवेणीधाम डाकोरधाम खालशाच्या ध्वजारोहणासाठी आले; मात्र काही मिनिटेच थांबत त्यांनी निर्वाणी आखाड्यात प्रयाण केले. अखेर सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करीत त्यांनी काही बाबी स्पष्ट केल्या. शाहीस्नान ठरल्याप्रमाणेच होणार असून, त्यासाठी आखाड्यांचा क्रम निश्चित करण्यात आला आहे; मात्र तो पोलिसांच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. सध्या चर्चेत असलेला वाद अनेक दिवसांपासून सुरू असून, त्यात नवे काहीच नाही. भावा-भावात भांडणे होतात; पण नंतर ते एकत्र येतातच. पाण्यात काठी मारल्यावर पाण्याचे दोन भाग होतात; पण ते लगेच एकत्रही येते. आम्हा साधूंचे तसेच आहे. आम्ही घरदार सोडून देव, देशकार्यासाठी आलो आहोत, एकमेकांशी भांडण्यासाठी नव्हे. समजा, मी अध्यक्ष नसलो, तरी अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी आखाड्याचा श्री महंत तर आहेच. शाहीस्नानात खरे महत्त्व हे अध्य्यक्षपदाला नव्हे, तर श्री महंतपदाला असते. अध्यक्ष फक्त कामे करवून घेण्यासाठी असतो. आमच्यातील वाद शाहीस्नानापर्यंत मिटेल. ईश्वरच तशी सद्बुद्धी देईल. माध्यमांनी कितीही प्रयत्न केले, तरी परिस्थिती बिघडणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: I'm a president, but is not it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.