मी जिवंत आहे, मला पुरून टाकलंय...
By Admin | Updated: November 24, 2015 22:52 IST2015-11-24T22:51:56+5:302015-11-24T22:52:28+5:30
अनोखे आंदोलन : भारतीय जनता पार्टी व शिवरुद्र प्रतिष्ठानने वेधले लक्ष

मी जिवंत आहे, मला पुरून टाकलंय...
सिडको : मीजिवंत आहे, पण मला पुरले आहे... मला वाचवा अशी भाविक साद घालणाऱ्या प्रतीकात्मक विहीर मातेची मूर्ती तयार करून जगण्यासाठी आटापिटा करणाऱ्या विहिरीची व्यथा मांडणारे अनोखे आंदोलन करण्यात आले.
बुजविण्यात आलेली जिवंत विहीर पुन्हा खुली करावी, यासाठी भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने बुजविलेल्या विहिरीच्या जागेवर प्रतीकात्मक विहीर तयार करून महापालिकेचे लक्ष वेधले आहे.
अंबड-डीजीपीनगर क्रमांक २ येथील सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांनी सभासदांना विश्वासात न घेता याठिकाणी असलेली जिवंत विहीर महापालिकेस हाताशी धरून बुजविली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश भाजपा क्रीडा आघाडीचे सदस्य याज्ञिक शिंदे यांनी आवाज उठविला आहे. सदर विहिरीचा कोणालाही त्रास नसताना. तसेच या विहिरीतील पाण्याचादेखील वापर होत असताना विहिर बुजविण्यात आली आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना मनपा प्रशासनाने सदरची जिवंत विहीर बुजविल्याने परिसरातील रहिवाशांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याचा निसर्गनिर्मित स्त्रोत बंद करण्याचा अधिकार कुणालाच नसतानाही तो बंद करण्याचा प्रकार सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांनी केल्याचा आरोप पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. सिनेकलावंत जयवंत वाडकर यांनीही याठिकाणी भेट देऊन जिवंत विहीर बुजविल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत महापौर, मनपा आयुक्त, विभागीय अधिकारी यांना कळवूनही दखल घेतली नसल्याने बंद करण्यात आलेल्या जिवंत विहिरीजवळच प्रतीकात्मक विहीर तयार करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी याज्ञिक शिंदे यांच्यासह प्रवीण येवले, कुलदीप बाविस्कर, प्रशांत जाधव, शुभम जुन्नरे, मयूर दीक्षित, किरण गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)