बेकायदेशीर बदल्या अखेर रद्द?
By Admin | Updated: September 10, 2016 00:54 IST2016-09-10T00:54:03+5:302016-09-10T00:54:26+5:30
जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश : तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

बेकायदेशीर बदल्या अखेर रद्द?
नाशिक : निफाड तालुक्यातील दोघा आरोग्यसेविकांच्या नियमाबाह्य बदल्या अखेर रद्द करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.
या नियमबाह्य बदल्यांबाबत ‘लोकमत’नेच ६ सप्टेंबर रोजी ‘तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच केल्या परस्पर बदल्या’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या अनियमिततेबाबत लक्ष वेधले होते. ३१ मे नंतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणास्तव बदल्या करण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्तांना असताना निफाडच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालखेड व चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोघा आरोग्यसेविकांच्या परस्पर प्रतिनियुक्त्यांचे काढलेले आदेश वादात सापडले होते. वस्तुत: तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवसांपुरता तात्पुरत्या स्वरूपात बदलीचा अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही अति महत्त्वाच्या तातडीच्या प्रसंगी आहे; मात्र १ सप्टेंबर २०१६ रोजी निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी नवलसिंग चव्हाण यांनी दोघा आरोग्यसेविकांच्या पालखेड व चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रतिनियुक्ती स्वरूपात बदल्यांचे आदेश काढले होते.
चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खेरवाडी उपकेंद्रात कार्यरत असलेली आरोग्यसेविका प्रमिला पोपटराव नवले यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत जावक क्रमांक/आरोग्य ता.वै.अ./५८/१६ च्या १ सप्टेंबरच्या आदेशान्वये पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळगाव ब-२ उपकेंद्रांत रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले होते. तसेच पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरवाडे वणी उपकेंद्रात कार्यरत श्रीमती ए. बी. ठाणेकर या आरोग्यसेविकेची जा.क्र./आरोग्य.ता.वै.अ./५९/१६ च्या १ सप्टेंबर २०१६ च्या आदेशान्वये पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दावचवाडी येथील उपकेंद्रातील रिक्त पदावर प्रतिनियुक्ती देण्याचे आदेश काढले होते. (प्रतिनिधी)