मखमलाबाद रोडवर अवैध प्रवासी वाहतूक
By Admin | Updated: October 2, 2015 23:07 IST2015-10-02T23:06:38+5:302015-10-02T23:07:59+5:30
मालेगाव स्टॅण्ड : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

मखमलाबाद रोडवर अवैध प्रवासी वाहतूक
नाशिक : मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद रोडवरील रिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत असून, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या चालकांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने रिक्षाचालक रिक्षांमध्ये अक्षरश: प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याची तक्रार होत आहे.
मालेगाव स्टॅण्ड येथून मखमलाबाद आणि या मार्गावरील नगरांसाठी प्रवासी वाहतूक केली जाते. वाढत्या वसाहतीमुळे या मार्गावरील रिक्षा वाहतुकीत वाढ झालेली आहे. काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून स्वत:चा आणि प्रवाशांचाही जीव धोक्यात आणत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
या पट्ट्यावरील रिक्षाचालक रिक्षात सात ते आठ प्रवासी कोंबून रिक्षात बसवतात. भरवस्तीतून अशा प्रकारची धोकादायक प्रवासी वाहतूक केली जात असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याची चर्चा आहे. याउलट पोलिसांचेच या वाहतुकीला अभय असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून रिक्षा हाकत असल्याने या रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद मार्गावर बसेसची संख्या कमी आहे. शिवाय ज्या काही बसेस आहेत त्या मालेगाव स्टॅण्डवर थांबत नसल्याने प्रवाशांना थेट सीबीएसवर सोडले जाते. त्यामुळे प्रवाशांना मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद गाव असा प्रवास रिक्षानेच करावा लागतो. हीच अडचण लक्षात घेऊन रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत असतात. पोलिसांनी याप्रकरणाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. रिक्षातील मागील सीटवर पाच किंवा चार, तर ड्राव्हरच्या पुढच्या बाजूवर दोन ते तीन याप्रमाणे प्रवाशांना बसविले जाते. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.
येथील अवैध प्रवासी वाहतुकीडे लक्ष देऊन संभाव्या अपघाताला आळा घालावा अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)