इंदिरानगरमध्ये अवैध वाळूचे ढीग
By Admin | Updated: June 9, 2016 00:26 IST2016-06-08T22:04:53+5:302016-06-09T00:26:10+5:30
रात्री वाहतूक : तक्रारी करूनही प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष; लागेबांधे असल्याचा संशय

इंदिरानगरमध्ये अवैध वाळूचे ढीग
इंदिरानगर : परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे ढीग वाढत असताना महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून अवैध वाळूची वाहतूक व ठिकठिकाणी असलेल्या ढिगाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
परिसरातील विविध उपनगरांमध्ये अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या वसाहती वाढत असून, या भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उंच इमारती व अपार्टमेंटच्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता भासते. त्यामुळे संगमनेर, कोपरगावसह जिल्ह्याच्या विविध भागातून रात्री दोन ते चार वाजेच्या सुमारास वडनेर गेट, पाथर्डी फाटा, वडाळा-पाथर्डी रस्ता, पिंगळे चौक आदि रस्त्यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रक सुरू असतात. यातील बहुतेक वाहनांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळू भरलेली असते. यातील काही वाहनांवर परिवहन विभागाचा नोंदणी क्रमांकही नसतो. तर काहींवर तो पुसटसा दिसतो. या वाहनांमधून येणारी अवैध वाळू इमारत बांधकामाच्या ठिकाणी अथवा मोकळ्या मैदानावरील ढिगाऱ्यांवर खाली केली जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे ढीग दिसत असून, यातील अनेक ढिगाऱ्यांवर बिनधास्त वाळूची चढ-उतार होते. अनेकदा वाळूत वाहने अडकल्याने त्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रस्त होतो. या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गुंडगिरीच्या भाषेचा सामना करावा लागत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. असे असतानाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळूच्या या काळ्याबाजाराला नक्की कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. (वार्ताहर)