बागलाण तालुक्यात अवैध व्यवसाय
By Admin | Updated: September 16, 2015 22:18 IST2015-09-16T22:16:06+5:302015-09-16T22:18:50+5:30
बागलाण तालुक्यात अवैध व्यवसाय

बागलाण तालुक्यात अवैध व्यवसाय
सटाणा : शहरासह तालुक्यात पोलिसांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा अवैध धंद्यांना ऊत आला आहे. या अवैधधंद्यांमुळे गावोगावी गुंडगिरीचे प्रकार वाढले असून, गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांततेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच असे अड्डे उद्ध्वस्त करून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, अशी मागणी कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार यांनी केली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मटका, जुगार, वाळूतस्करी सारखे अवैधधंदे चालू देणार नाही अशी गर्जना केली होती; मात्र उलट बागलाण तालुक्यात या अवैध धंद्यांना तेजी आली असल्याचे कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष खैरनार यांनी निवेदनात नमूद करून पालकमंत्र्यांची गर्जना हवेत विरली आहे. बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, मोरकुरे, मुल्हेर, ताहाराबाद, नामपूर, हरणबारी, आराई परिसरात मटका आणि जुगार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोस सुरू आहे. तक्रारी गेल्यावर पोलिसांकडून कारवाईचा फक्त फार्स केला जातो. त्यानंतर धंदे पुन्हा सुरू केले जातात. आधीच दुष्काळाच्या चटक्यांनी असह्य झालेला शेतकरी, मजूर यांची मुले या अवैधधंद्याच्या विळख्यात सापडली असून, कुटुंब अक्षरश: बरबाद होत चालली आहेत तर दुसरीकडे या धंद्यांच्या संरक्षणासाठी गुंड पोसली जात आहेत. त्यामुळे गावोगावी गुंडगिरीमुळे दहशत निर्माण केली जात असून, गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवाला गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता असे अड्डे कायमस्वरूपी उद्ध्वस्त करावेत, असेही खैरनार यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)