दुर्लक्ष : जलशुद्धीकरण केंद्रात साहित्याचा तुटवडा
By Admin | Updated: October 30, 2014 22:31 IST2014-10-30T22:31:27+5:302014-10-30T22:31:44+5:30
सिन्नरला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

दुर्लक्ष : जलशुद्धीकरण केंद्रात साहित्याचा तुटवडा
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात दुर्गंधीयुक्त व बेचव पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार विरोधी गटनेते विजय जाधव व नगरसेवक शैलेश नाईक यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील टीसीएल पावडर, आलम व क्लोरीन संपुष्टात आले असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांना दुर्गंधीयुक्त व बेचव पाणी पिण्याची वेळ आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
दारणा नदीपात्रातून पाणी उपसल्यानंतर माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोहदरी वनउद्यानातील जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून, पिवळसर दिसणाऱ्या पाण्याला वास येत असून, ते बेचव लागत असल्याची तक्रार करण्यासाठी जाधव व नाईक पालिका कार्यालयात गेले होते. मात्र मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता या जबाबदार अधिकाऱ्यांची भेट झाली नाही. यावेळी त्यांनी चौकशी केली असता जलशुद्धीकरण केंद्रातील टीसीएल पावडर, आलम व क्लोरीन संपले असल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, यासंदर्भात पाणीपुरवठ्याचे कर्मचारी कमलाकर ओतारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांपूर्वी केवळ क्लोरीन गॅस संपले असल्याचे सांगितले. एक-दोन दिवसात तो उपलब्ध होईल, अशी माहिती दिली.