सत्तेच्या संगीत खुर्चीत कामांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 11, 2014 00:51 IST2014-07-10T23:08:14+5:302014-07-11T00:51:31+5:30
सत्तेच्या संगीत खुर्चीत कामांकडे दुर्लक्ष

सत्तेच्या संगीत खुर्चीत कामांकडे दुर्लक्ष
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य अनुपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. पर्यायाने पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांना सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. याचा परिणाम सिंहस्थ कामाच्या निविदा उघडता न आल्याने महत्त्वाचे निर्णय घेता आले नाहीत. तसेच गावाच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेल्या सिंहस्थ समिती स्थापन करण्याचाही निर्णयही घेता आला नाही.
यासंदर्भात चौकशी केली असता विद्यमान नगराध्यक्ष अडसरे यांनी आपापसातील रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि ठरल्यानुसार दुसऱ्याला संधी द्यावी या कारणास्तव निषेध म्हणून सभेला उपस्थित राहिले नसल्याची शहरात चर्चा आहे.
या राजीनामानाट्यात गावचे विकासाचे निर्णय मात्र प्रलंबित राहिले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाचे गटनेते रवींद्र (बाळा) सोनवणे म्हणाले, या विशेष सर्वसाधारण सभेस सत्तारूढ गटाने उपस्थित राहणे गरजेचे असताना संगीत खुर्चीच्या खेळात केवळ सिंहस्थ कामे आपल्याच कार्यकाळात व्हावीत म्हणून हा राजीनामा घेण्याचा अगर राजीनामा न देण्याचा आटापिटा चालू आहे. गावाशी काहीच देणे-घेणे नसल्याची कडवट टीका सोनवणे यांनी केली.
सध्या सत्तारूढ गटात केवळ एका मताचे बहुमत असून, विरोधी गटाकडे आठ सदस्य आहेत. स्वीकृत सदस्य सत्तारूढ गटाकडून असून, कदाचित राजकारणाची समीकरणे बदलण्याचीही शक्यता शहरात वर्तविली जात आहे. शहर व आगामी कुंभमेळ्याशी कोणाला काही देणे-घेणे नसल्याचीही शहरात चर्चा आहे. (वार्ताहर)