स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: November 21, 2014 01:02 IST2014-11-21T00:57:37+5:302014-11-21T01:02:13+5:30

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

Ignore cleanliness campaign | स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

मालेगाव : कायम केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे. गलिच्छ शहर अशीच शहराची ओळख कायम असून, शहर वर्षभर विविध साथींच्या आजारांनी त्रस्त राहत आहे.
हद्दवाढ भागासह शहरातील लोकसंख्या एकीकडे वाढत असताना त्यातुलनेत येथील महानगरपालिका सफाई कामगारांची संख्या वाढलेली नाही. दुसरीकडे साफसफाईचा देण्यात आलेला खासगी ठेका हा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील काही ठराविक भाग वगळता बहुतांश भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी अजूनही म्हणावी तशी जागरूकता नाही.
एक हजार लोकसंख्येमागे एक झाडूकामगार, एक गटार कामगार व एक सफाई कामगार असे तीन कामगार असावयास हवेत. त्या हिशेबाने साधारण सात लाख लोकसंख्येच्या मालेगाव महानगरपालिकेत कायम २१०० व अतिरिक्त तीनशे असे २४०० कामगार असावयास पाहिजे. मात्र आजमितीस मनपात त्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे जवळपास अकराशेच कामगार आहेत. विशेष म्हणजे त्यातही खुद्द मनपा प्रशासनाच्या कामगारांची संख्या ही अवघी साडेसहाशे असून, उर्वरित साडेचारशे कामगार हे खासगी ठेकेदाराकडील आहेत. यातही जे पदवीधर, पदव्युत्तर आहेत; परंतु मनपात भरती होताना कामगार म्हणून रुजू झाले आहेत ते मात्र प्रत्यक्षात आपल्या शिक्षणाचा सदुपयोग म्हणून मनपाच्या विविध खात्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत. किरकोळ रजा, आजारपण, लग्नादी कार्यासाठी रजेवर असणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्यक्षात शहर साफसफाईसाठी रोज मनपाचे पाचशे कामगार देखील उपलब्ध असतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्याउपर शहरसाफसफाई कशी, कितीवेळ, कोणत्या पद्धतीने होते हादेखील स्वतंत्र विषय आहे.
ज्या गाड्या कार्यरत आहेत त्या विशिष्ट भागात विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या वॉर्डातच अधूनमधून कार्यरत दिसून येतात. मालेगाव शहरातून घंटागाड्यांमधून रोज १९० ते २०० टन किंवा त्याहून अधिक कचरा उचलला जात असल्याचा मनपा स्वच्छता विभागाचा दावा आहे. मात्र या दाव्याविषयीदेखील येथे वाद असून, कमी कचऱ्याचे ट्रॅक्टर्स जास्त वजनाचे दाखवून मनपाचा पैसा लाटला जास्त असल्याचा आरोप मनपातील विरोधी जनता दल गटनेत्यांकडून यापूर्वी पुराव्यानिशी करण्यात आलेला आहे.
देशभरात सध्या स्वच्छ भारत मोहीम जोरात सुरू आहे. मात्र दरवेळेस केंद्र व राज्य शासनाकडे आर्थिक अनुदानाच्या अपेक्षेने डोळे लावून पाहणाऱ्या येथील स्थानिक मनपा प्रशासन व प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी पक्षातर्फे तशी कुठलीही मोहीम येथे अद्याप राबविण्यात आलेली नाही.
शहर - तालुक्यात देखील विविध शाळा - महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया, अतिसारचे रुग्ण प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्यानंतरदेखील शहर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष अशी मोहीम राबविली गेलेली नाही.
याउलट शहरातील मोसम नदीकाठ, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, विविध प्रमुख सरकारी कार्यालये, विविध छोटी-मोठी हॉटेल्स परिसरातील नेहमीचा घाणकचरा हा कायमच आहे.

Web Title: Ignore cleanliness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.