विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष
By Admin | Updated: September 27, 2016 00:47 IST2016-09-27T00:46:53+5:302016-09-27T00:47:20+5:30
आश्रमशाळा प्रशासन : पेठ येथील प्रकाराने पालक भयभीत

विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष
पेठ : येथील मविप्रच्या वांगणी येथील आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गातील निवासी असणाऱ्या मुलीच्या डोक्याला जबर जखम होऊनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर मुलीस वेदना सहन करत वास्तव्य करण्याचा प्रकार उघडकीस आला.
पेठच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणारी मीना रामदास मोहंडकर या विद्यार्थिनीच्या डोक्यात मोठी जखम होऊन त्यामध्ये अक्षरशा: जंतू तयार झालेले असल्याने तिला उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात शाळेच्या कामाठ्याने दाखल केल्याची खबर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य व सेना तालुकाध्यक्ष भास्कर गावित यांना मिळाल्याने त्यांनी थेट रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थिनीची भेट घेतली.
तिच्या डोक्यावरील जखमेत मोठा खड्डा पडून त्यातून जिवंत अळ्या पाहून प्रारंभी ते भावनावश झाले. मात्र उपचार सुरू असताना लहान जिवाच्या प्राणांतिक वेदना बघून संतप्त झालेल्या गावित यांनी कार्यकर्त्यांसह थेट आश्रमशाळेस भेट दिली.
यावेळी आश्रमशाळेतील अनेक त्रूटी निर्दशनास आल्याने त्याबाबत आपण जिल्हा परिषदेत व शासनाकडे दाद मागणार असल्याचे जि.प. सदस्यांनी सूतोवाच केले असल्याने किमान या प्रसंगाने तरी विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा होणार की पुन्हा त्याच अग्निदिव्यास विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार हे काळच ठरवेल. यावेळी रामदास वाघेरे, रघुनाथ चौधरी, मोहन कामडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
येथे एकूण ६४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी पहिली ते दहावीपर्यंतचे २६६ विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी आहेत. मात्र त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधीक्षक , अधिक्षिका तसेच चौकीदार यांची पदे मंजूर असूनही भरण्यात आलेली नाहीत. शिक्षक अध्यापन करून वेळ मिळेल तसे विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असल्याने डोक्यात जिवघेणी जखम झाली तरीही त्याकडे लक्ष देण्यास कुणास फुरसत नसल्याने कामाठीने पीडित मुलीस उपचारासाठी आणले.