दुर्लक्ष : अवनखेड येथील पुलाचे काम निकृष्ट

By Admin | Updated: July 26, 2016 21:53 IST2016-07-26T21:53:02+5:302016-07-26T21:53:02+5:30

कळवण-नाशिक रस्त्यावर खड्डे

Ignorance: The work of the bridge at Avankhed is worthless | दुर्लक्ष : अवनखेड येथील पुलाचे काम निकृष्ट

दुर्लक्ष : अवनखेड येथील पुलाचे काम निकृष्ट

दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावरील अवनखेड येथील तीन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केलेल्या नवीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याही खड्डेमय झाला आहे. रस्ता व पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, पहिल्याच पावसाने रस्ता पूर्णत: उखडला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अवनखेड येथील पूर्वीच्या अरुंद पुलावर अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर येथे नवीन पूल बांधण्यात आला. रस्ता खासगीकरणातून झाला; परंतु त्यातून पूल वगळला गेला होता. अखेर सदर ठिकाणी बांधकाम विभागाने नव्याने पूल करत जुन्या व नव्या पुलावरून एकेरी वाहतूक नुकतीच तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली होती; मात्र पुलाच्या दुतर्फा नवीन रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने पाऊस होण्यापूर्वीच तो खराब होऊ लागला होता. जोरदार पाऊस होताच त्यावर खड्डे पडले असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
या रस्त्याने दररोज हजारो वाहने जात येत असून, खड्डे टाळण्यासाठी आता काही वाहनधारक पुन्हा जुन्या पुलावरून जात असून, त्यामुळे किंवा रात्रीच्या वेळी खड्डे ना दिसल्यास वाहने आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग पूर्ण दुर्लक्ष करत असून, सदर कामाची चौकशी करत संबंधित ठेकेदार यांच्याकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नाशिक - कळवण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Ignorance: The work of the bridge at Avankhed is worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.