लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इगतपुरीतील रेव्ह पार्टीसाठी बॉलिवूडशी संबंधित दोन कोरिओग्राफर अन् अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या २२ व्यक्तींचा समूह इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये थेट तीन दिवसांच्या मुक्कामाला आलेला होता. या हायप्रोफाईल नशेबाजांच्या समूहाने ‘हवाईयन’ संकल्पनेवर अधारित तीन दिवसीय रेव्ह पार्टीचा बेत आखला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली आहे. अभिनेत्री हीना पांचालसह अन्य ११ महिला आणि सहा पुरुषांना एक दिवसाची तर चौघा पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दोन खासगी बंगल्यात पीयूष सेठियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. सोमवारी २२ जणांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आरोेपींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. आरोपींनी एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारू रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरून पोलिसांनी निष्पन्न केले आहे. तसेच तेवढ्याच किमतीचा सीलबंद मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हीना पांचाल मुख्य आकर्षणहवाई बेटांप्रमाणे ‘हवाईन थीम’च्या धर्तीवर रंगलेल्या या रेव्ह पार्टीचे मुख्य आकर्षण बॉलिवूडची अभिनेत्री हीना पांचाल हेच होते. पार्टीत ड्रग्ज, कोकेन, गांजा, चरससारख्या नॉर्कोटिक्स पदार्थांचे सर्रासपणे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असल्याचे पोलिसांना आढळले.
काय आहे ‘हवाईयन पार्टी’?‘हवाईयन’ अर्थात हवाई बेटांवरील संस्कृतीला साजेशा संकल्पनेवर अधारित ही पार्टी असते. यास ‘लुलु पार्टी’सुद्धा म्हटले जाते. रंगीबेरंगी फुलांची डिझाईन असलेले कमी-कमीत कपडे या पार्टीमध्ये घातले जातात. हवाई नावाचे उष्ण वातावरण असलेले बेट आहे. त्यामुळे तेथे लोक कमी कपडे घालतात.
‘हीना’ला दाखविला खाकीचा धाककारवाईवेळी हीना पांचाल हिच्या सेलिब्रिटी ॲटिट्युडचा पोलिसांना सामना करावा लागत होता. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत हीनाला दम भरल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिने तपासकार्यात सहकार्य केले.