इगतपुरी : पंचायत समितीचा गैरकारभार
By Admin | Updated: July 13, 2015 00:06 IST2015-07-13T00:01:10+5:302015-07-13T00:06:34+5:30
पदाधिकारी वाहनाविना

इगतपुरी : पंचायत समितीचा गैरकारभार
इगतपुरी : पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींना गेल्या १५ दिवसांपासून हक्काच्या वाहनाविना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. सभापती, उपसभापती यांच्यासह गटविकास अधिकारी या कारणाने त्रस्त झाले आहेत. वाहन आहे पण चालक नसल्याने संपूर्ण प्रशासन कात्रीत सापडले आहे. सात महिन्यांपासून मागणी केलेल्या वाहनाच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने केराची टोपली दाखविली आहे. पदाधिकाऱ्यांना वाहनाशिवाय तालुक्याचा गाडा हाकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
इगतपुरी पंचायत समितीमध्ये दोन वाहने कार्यरत होती. यापैकी एक वाहन जीर्ण होऊन वापरायोग्य नसल्याने त्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सात महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला आहे. ह्या वाहनाचे चालक त्या कारणाने प्रतिनियुक्तीवर तालुक्याबाहेर कार्यरत झाले आहेत. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह गटविकास अधिकाऱ्यांकडे सध्या एकच वाहन आहे. परंतु त्या वाहनाचे चालक सेवानिवृत्त झाल्याने वाहनास कोणी चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी चालक नसल्याने सभापती गोपाळा लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह गटविकास अधिकारी किरण कोवे यांना तालुक्याचे कामकाज पाहता येत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. दरम्यान निर्लेखित वाहनाबाबत आणि वाहकाबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय न घेतल्याने अडचणी वाढणार आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायती, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र, शाळांना पदाधिकाऱ्यांसह, बीडीओंकडे वाहनच नसल्याने भेटी देता येत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर अनागोंदी वाढली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास पदाधिकारी आक्रमक होऊन कामकाजावर बहिष्कार टाकतील असा इशारा सभापती गोपाळा लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी दिला आहे.(वार्ताहर)