घोटी : इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ५७ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी १०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण १५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आजी माजी आमदारांच्या वारसांनी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आजी माजी पदाधिका-यांनी आपल्या घरातील प्रतिनिधींचे अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. सोमवारी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इगतपुरी तहसील आवारात चांगलीच गर्दी झाली होती. सर्वपक्षीयांनी तिकीट वाटप करून उशिरापर्यंत उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. निवडणुकीची प्रक्रि या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल पुरे पाहत आहेत. आज अंतिम दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ होत होती अधिकारी, कर्मचारी यांची मात्र दमछाक झाली. शेवटच्या दिवशीच पाच गटांसाठी ५७ तर दहा गणांसाठी १०१ अर्ज दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या ५ गटांमधील घोटी १३, शिरसाठे ७, वाडीव-हे ७ , खेड ११, नांदगांव सदो ७ अर्ज दाखल झाले आहेत. घोटी गटात सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.जिल्हा परिषद पंचायत समतिीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील नेते व इच्छुकांनी उमेदवारी प्रतिष्ठेची केली आहे. तालुक्यातील आजी माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्तींचा, दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत बदलत्या आरक्षणाने युवकांना उमेदवारीची मिळालेली संधी यामुळे चुरस वाढल्याने तहसील आवारात विक्र मी गर्दी होती. राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्याने अधिकृत उमेदवारांनी अर्जासोबत एबी फॉर्मही दाखल केले. विद्यमान सभापती गोपाळ लहांगे यांच्या पत्नी अनिता लहांगे ( शिवसेना ), आमदार कन्या नयना गावित ( काँग्रेस ) माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी तथा एकलहरा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुशिला मेंगाळ ( शिवसेना ), पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे ( शिवसेना ), माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव ( राष्ट्रवादी ), शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव ( शिवसेना ), संदीप किर्वे (मनसे), संदीप शहाणे(भाजपा), मनोहर घोडे ( काँग्रेस ), वसंत डामसे ( भाजपा ), माजी सभापती कावजी ठाकरे ( शिवसेना ), युवा नेते राजू गांगड ( भाजपा ), माजी महसुल अधिकारी सोमनाथ ठोकळ ( शेकाप ), गणांमध्ये सेनेचे युवा नेते विठ्ठल लंगडे ( शिवसेना ), माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे यांच्या पत्नी ममता गाढवे ( राष्ट्रवादी ), माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी यांच्या सुन लक्ष्मीबाई माळी, सहकार नेते रघुनाथ तोकडे यांच्या स्नुषा विमल तोकडे ( शिवसेना), पांडुरंग शिंदे यांच्या पत्नी विठाबाई शिंदे ( काँग्रेस ) या उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. (वार्ताहर)
इगतपुरीत आजी-माजी आमदारांचे वारसदार रिंगणात
By admin | Updated: February 7, 2017 01:41 IST