वृध्द माता-पित्यांची हेळसांड कराल तर... खबरदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:21+5:302021-07-07T04:17:21+5:30
वृध्द आई-वडिलांना बहुतांश मुले जणू घरातील अडगळ समजू लागतात अन् त्यांना जन्मदात्यांचे ओझे वाटू लागते. अशा वारसदारांकडून माता-पित्यांना थेट ...

वृध्द माता-पित्यांची हेळसांड कराल तर... खबरदार!
वृध्द आई-वडिलांना बहुतांश मुले जणू घरातील अडगळ समजू लागतात अन् त्यांना जन्मदात्यांचे ओझे वाटू लागते. अशा वारसदारांकडून माता-पित्यांना थेट घराचा बाहेरचा रस्ता दाखविला जातो अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावते. सिडको परिसरात असाच एक प्रसंग समोर आल्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कठोर भूमिका घेत वृध्द आईवडिलांचा अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळ करणे व त्यांना योग्यप्रकारे वागणूक देत औषधोपचार करणे हे त्यांना जन्माला घातलेल्या मुला-मुलींचे नैतिक कर्तव्य आहे; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. अनेकदा वृध्द पुरुष, महिला बेवारसपणे भटकंती करताना शहराच्या सभोवताली नजरेस पडतात, त्यामुळे आता यापुढे वृध्दांची हेळसांड थांबविण्यासाठी पालक, ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७नुसार असलेल्या तरतुदींप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाण्डेय म्हणाले.
--इन्फो--
‘त्या’ स्मशानातील वृध्दाने वेधले लक्ष
सिडको परिसरात काही दिवसांपूर्वी ८१ वर्षीय वृद्धास मुले सांभाळत नसल्याने थेट येथील स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांच्या चितेसाठी सरण रचून आपला उदरनिर्वाह चालविण्याचा बाका प्रसंग ओढावल्याची बाब प्रकाशझाेतात आली होती. तसेच एक वृद्ध घरातच पाय मोडल्याने वेदनेने दोन दिवस उपाशीपोटी विव्हळत असल्याचाही प्रकार समोर आला होता. सिडकोतील सह्याद्रीनगरमध्ये रविवारी कुजलेल्या अवस्थेत एका ७५वर्षीय वृध्देचा मृतदेहदेखील घरात आढळून आला होता. या सर्व घटनांवरून व्यथित होत संवेदनशील पाण्डेय यांनी शहर पोलिसांना वृध्दांची हालपेष्टा रोखण्याचे आदेश सोमवारी दिले.
---इन्फो---
समाजकल्याण अधिकाऱ्यांना पाठिवले लेखी पत्र
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वृध्दांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य कष्टविरहित सुखाने जगता यावे, यासाठी तत्काळ समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठविले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना पत्रात करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशीअंती दखलपात्र गुन्हा निष्पन्न होत असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात कायद्याच्या कलम-२५प्रमाणे सरकारकडून फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा, असेही पत्रात म्हटले आहे.