बोले तो मामू, अब जुना नासिक इस्मार्ट बनेगा...!
By Admin | Updated: December 1, 2015 23:41 IST2015-12-01T23:39:42+5:302015-12-01T23:41:03+5:30
बोले तो मामू, अब जुना नासिक इस्मार्ट बनेगा...!

बोले तो मामू, अब जुना नासिक इस्मार्ट बनेगा...!
संजय पाठक
अहाहा... काय हे बदलले गाव... (सॉरी, गाव नव्हे सिटी)... आनंदवलीवरून रपेट मारीत सायकलने जुन्या नाशिकचा प्रारंभ होणाऱ्या अशोकस्तंभावर गेले की, तेथे
‘स्मॉर्ट सिटी नाशिकमध्ये आपले स्वागत असो’ असे ग्रॅण्ड वेलकम करणारी ‘स्मार्ट’ कमान... थोडे पुढे गेले की, सरकारवाड्यात सीसीडी म्हणजेच कॉफीशॉप. सगळे जुने वाडे गायब. त्यांच्याजागी टोलेजंग इमारती. प्रत्येक इमारतीचा फ्रंटेज एकसारखाच. नाशिक की जयपूर हे? कुठे अतिक्रमण नाही की हातगाडी नाही. रस्त्याच्या गल्ली-बोळांमध्ये नीटनेटकी दुकाने. रस्त्यावर केवळ पादचाऱ्यांचा हक्क मान्य केलेला. त्यामुळे रस्त्यावर दुचाकीही नाही. महात्मा गांधी रोडवर तर कमालच झाली. वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि पादचाऱ्यांंसाठी दुतर्फा मार्ग... जुन्या नगरपालिकेचे तर हेरिटेज इमारतीत रूपांतर झालेले. अवघा नाशिकचा इतिहास तेथे सामावलेला...
- या स्वप्नातून एक एनआरएन (नॉन रेसिडेंशियल नाशिककर) जागा झाला, तेव्हा पालिका कारभाऱ्यांनी आयोजित केलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या संकल्पनाचित्र सादरीकरणाचा सांगता सोहळा आटोपत आला होता. रावसाहेब थोरात सभागृह रिते होऊ लागले होते. त्या नाशिकची ही गोष्ट आहे ही...
प्रत्येक गावाला काही ना काही ओळख असते. तसेच हे साहित्याचे, विचारवंत आणि बंडखोरांचेही गाव. गावाचे आता रूपांतर महानगराकडे होत असले तरी महानगर झालेले नाही. ‘उपमहानगर’ अशी ओळख मात्र निश्चितच झालेली. तसे या नगरीत सारेच ‘विचारवंत’... ‘अविचारी’ शोधून सापडला तेवढाच. फक्त विचारात फरक होता. कोणी ‘अ-विचारी’ तर कोणी ‘ब-विचारी’ एवढाच काय तो फरक. ‘क’-विचारी व्यक्ती मात्र कोणाच्या खिजगणतीतही नव्हती.. ‘जनता राज’ची सत्ता ज्यांच्या हाती होती, त्यांचे मुख्य कारभारी म्हणजे महापुरूषच. ते प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करीत असत की, खूप विचाराअंती काहीच निर्णय घेत नसत! दुर्बाेध विचार अथवा मतप्रदर्शन हा विचारवंताच्या अंगी असलेला गुण (?) त्यांच्या अंगी ठायी-ठायी भरलेला होता. म्हणजेच या कारभारी पौरांना कधी कोणी ‘आज वॉर्डात पाणी का आले नाही’ असा प्रश्न केला तर ‘ते चिऊताई चिऊताई दार उघड’ असे म्हटल्यानंतर कावळ्यासाठी चिमणीने दार का उघडले नाही, असा प्रतिप्रश्न करतील. मग वॉर्डात पाणी न येण्याचा अन् चिऊ-काऊचा काय संबंध, असा प्रश्न कोणालाही पडेल; परंतु या उंच, धिप्पाड महापुरूषाच्या गोष्टीच वेगळ्या. त्याला कोण काय करणार?
याच नगरीचा कारभार पाहणारे दुसरे प्रशासकीय कारभारीही थोर विचारवंत. परंतु हे काहीसे वेगळे. त्यांच्या मनात विचार येतो आणि तो लगेचच अमलात आणण्याची घाई सुरू होते. मग त्यांना असे कोणतेही विचार सुुचण्याची वेळकाळ रात्र-मध्यरात्र कोणतीही असो. आपल्या कनिष्ठ शिलेदारांनी आपला विचार अमलात आणलाच पाहिजे, असा त्यांचा खाक्या. तर या उपनगरीला ‘स्मार्ट’ करायचे आहे, असा म्हणे सरकारने सांगावा धाडला. आता ‘स्मार्ट’ म्हणजे काय रे भाऊ’ हे राज्यस्तरावरील थोरल्या पात्यांनी धाकल्या पात्यांना आणि धाकल्या पात्यांनी आपल्याकडील धाकल्या पात्यांना काहीच सांगितले नाही. सांगितले ते फक्त एकच- आपले नाशिक ‘स्मार्ट’ कराययेच. मग काय, जो तो ‘स्मार्ट’चा विचार करू लागला. साऱ्यांनी कामेधामे सोडली. फक्त एकच विचार, शहराला ‘स्मार्ट’ करायचे; पण काय स्मार्ट करायचे, हे कोणालाही स्पष्ट होईना!
मग शहरातील काही विचारवंतांच्या संघटनांनी चर्चासत्रे, परिषदा भरवल्या. वृत्तपत्रांतून त्याचे रकानेच्या रकाने भरून येऊ लागले. अनेकांनी सकाळ आणि सायंकाळ एकच ध्यास घेतला. नगरीचा कारभार हाकणाऱ्या पालकांना तर ‘स्मार्ट’ करायचे म्हणजे काय, हे खूप विचार करूनही समजेना. मग दिसेल ते ‘स्मार्ट’. म्हणजे पाणीपुरवठा करायचाच... मग ‘स्मार्ट पाणीपुरवठा योजना’ म्हणा... शहरात टॉयलेट्स नाहीत? मग ‘ई टॉयलेट योजना’... असे सारे काही सुरू होते. शहरातील सामान्यातील सामान्य नागरिक असला तरी शेवटी त्यालाही मत आणि विचार असतोच ना... मग त्याच्यातील ‘विचारवंत’ जागा करायचे ठरले. साऱ्यांनाच ‘स्मार्ट’ शब्दाने भारले. शहरातील आबालवृद्ध, शाळेतली पोरेटोरे सारे फेऱ्या काढून ‘शहर स्मार्ट झालेच पाहिजे’... पण ‘स्मार्ट’ करायचे म्हणजे काय करायचे, हे कोणाला कळेना... शहराचे प्रशासकीय प्रमुख कारभारी असलेले साहेब तर जाम वैतागले. विचार करून करून करून त्यांनी नागरिकांकडूनच सूचना मागवायचे ठरवले. मग पानाचा ठेला, भाजीबाजार सर्वत्र सूचना आणि अभिप्रायपत्रे भरून घेण्याची स्पर्धाच सुरू झाली. परंतु लोकांची वेगळीच तक्रार होती. ‘स्मार्ट’ म्हणजे काय याचेच स्पष्टीकरण नाही तर काय करायचे? तरीही ज्याला जे जमेल ते-ते विचार सुचले ते त्यांनी अर्जांत
प्रसवले.
खूप झाले, नगर ‘स्मार्ट’ करण्याची तारीख जवळ आली तरी ‘स्मार्ट’ होण्याची कल्पना ‘डिलिव्हर’ होईना... मग काय, कोणी तरी खास उपाय सुचवला. प्रशासकीय प्रमुख हे डॉक्टरच! त्यामुळे त्यांना सगळ्या रोगांवर आपल्याकडेच अक्सीर इलाज असल्याची खात्री होती. त्यामुळे त्यांना ती कल्पना मानवली. या शहरातले अनेक विकासक बडे जमीनदार आहेत. त्यांच्या जमिनींवर ‘उप उप नगर’ वसवले तर..? प्रशासकीय कारभाऱ्यांना कल्पना पटली. साऱ्या विकासकांना बोलवले. ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांना सारे काही सांगितले. मात्र ते कसले ऐकतात? ते ‘आर्थिक विचारवंत’ श्रेणीतील असल्याने त्यांनी नगरापेक्षा अर्थकारणावरच भर दिला. मग हा विचारच खुंटला.
४४४
मग प्रमुखांच्या विचारांच्या पोतडीतून ‘आयडिया क्रमांक दोन’ बाहेर आली. शहरात तशीही हिरवळ जरा जास्तच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या जमिनींवर असे ‘उप उप नगर’ साकारले तर? कोणी तरी शहरातल्या विचारवंतांनी हा विचार प्रशासकीय प्रमुखांकडे मांडला. त्यांना तो मानवला. त्यांनी तत्काळ शेतकऱ्यांची बैठक बोलावली. ‘जमिनी दिल्या तर तुम्हाला अमूक देतो-तमूक देतो’ असे सारे काही सांगितले; परंतु शहरातील शेतकरी म्हणजे पक्के बिल्डर झालेले. कोणीही हो म्हटले नाही आणि ना म्हटले नाही. पुन्हा तोच प्रश्न- ‘स्मार्ट’ कसे होणार?
४४४
मग कोणा कारभाऱ्याच्या मनात भन्नाट कल्पना आली. प्रशासकीय कारभाऱ्यांना ती इतकी मानवली की, अवघ्या काही दिवसांत अख्खे प्रेझेंटेशन तयार झाले. ज्या जुन्या नाशिकमुळे शहराचे अस्तित्व आहे, तो भाग अजूनही जुनाच आहे. शहराचा मध्यभाग सोडून सर्वत्र टोलेजंग इमारत होत असताना, जुने आणि पडके वाडे, भग्न अवशेष म्हणजे शहराचे जणू दारिद्र्यच, खरे तर हे दारिद्र्य दूर करण्याची जबाबदारी नगर-सेवकांनी म्हणजेच नगर विकासकांनी यापूर्वीच स्वीकारली आहे. त्यांना थोडे प्रोत्साहन दिले तर असे ‘वाडेकरू’ (की वाडेपाडू?) नगरसेवक सहर्ष योजना राबवतील आणि वाडेही पाडतील... कित्ती छान योजना! आरेखन करणाऱ्यांचे जे विचार कागदावर संकल्पनेत उतरले, ते बघितल्यानंतर मुंबई-पुणेचनव्हे, तर इंग्लंड-अमेरिकेत गेलेले नाशिककरसुद्धा ‘नाशिक जैसा कहीं नही’ म्हणत शहरात परत येतील, बघा किती दूरदृष्टी!
विचार करा आनंदवली ते रामवाडीपर्यंत संथ वाहणाऱ्या गोदाकाठी सायकल ट्रॅक, गोदाविहारासाठी नौका. शहराच्या मध्यवस्तीत पडक्या वाड्यांचे दारिद्र्य जाऊन वैभवशाली उंच इमारती... त्याही जयपूरच्या धर्तीवर एका रंगाच्या.! मग सरकारवाड्यात कॉफी प्या आणि लगेचच जुन्या नाशकात जाऊन दुबईचे प्रसिद्ध नॉनव्हेज खा....सारे काही हटके!
- काही मंडळी इतकी हुरळून गेली की, साऱ्या साऱ्या ठिकाणी सांगत सुटली, नाशिक ‘स्मार्ट’ होतेय... सराफ बाजारात फुले विकणाऱ्या महिलेला सांगितले, ‘मावशी, आता नाशिक स्मार्ट होणार बरं का..’ तिला काही उमजेना... मग मेनरोडच्या पादत्राणे विकणाऱ्याला तेच सांगितले... तो काहीसा कोड्यात पडला आणि म्हणाला, ‘आता आपण ‘स्मार्ट’ झालो म्हणजे भाऊंना हफ्ते द्यावे लागणार नाही ना?’
त्याची निरागसता बाजूला ठेवून ही मंडळी जुन्या नाशिकमध्ये शिरली. बुधवार पेठेतील बुरखाधारी महिलेला सांगितले, ‘अभी नाशिक स्मार्ट होगा...’ तिने प्रश्नार्थक चेहरा करून म्हटले, ‘याने की जुना नासिक मे अब दोन टाइम पानी मिलेगा क्या?’
तिचा भाबडेपणा बाजूला ठेवून मंडळी पुढे पखाल रोडकडे वळली. ‘अपना सिटी अब स्मार्ट होनेवाला हैं मामू... अब जुने नासिक मे बिल्डिंगे बनेंगी, पहिले माले पे गॅरेज.. दुसरे माले पे सर्व्हिस स्टेशन...’
- ऐकणारा मामू पार कोलमडूनच गेला.
सारे हुरळले आहेत... नागरिक आता वाट बघताहेत... नाशिक ‘स्मार्ट’ कधी होतेय ते!
४४४
(... अन् स्मार्ट नाशिकची चर्चा होता होता कल्पनेचे कारंजे उंच उडू लागले. शहर ‘स्मार्ट’ करता येईल म्हणजे काय करता येईल, असा प्रश्न प्रशासकीय प्रमुखांनी एका बैठकीत केला. तेव्हा निम्नस्तरावरील एका कारभारी विचारवंताने शहरातील सर्व नागरिकांना मोफत स्मार्टफोन देण्याची कल्पना मांडली होती. मात्र स्मार्टफोनच्या खरेदी विषयावरून अनेक डिपार्टमेंटनी आपणच हे काम करू शकतो, असे सांगितले. त्यांचा उत्साह बघून प्रशासकीय कारभारप्रमुख हर्षित झाले; परंतु नंतर सारेच कारभारी टेंडर काढण्यासाठी हा आटापिटा करीत असून, त्यांचा मोठा आर्थिक विचार यात दडला असल्याचा संशय आल्यानंतर कारभारप्रमुखांनी स्मार्टफोन वाटपाचा प्रस्ताव बैठकीतच फेटाळला!)