मुदतठेवींची रक्कम न दिल्यास जिल्हा बॅॅँकेवर फौजदारी
By Admin | Updated: April 27, 2017 02:10 IST2017-04-27T02:10:30+5:302017-04-27T02:10:40+5:30
नाशिक : मजूर सहकारी संघाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत दोन कोटींची ठेवींची रक्कम अदा न केल्याने बॅँकेने जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे

मुदतठेवींची रक्कम न दिल्यास जिल्हा बॅॅँकेवर फौजदारी
नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत दोन कोटींची मुदतठेवींची रक्कम खात्यात असूनही, ती वेळीच अदा न केल्याने जिल्हा बॅँकेने जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे. या ठेवींची मुदत संपली असून, खात्यात रक्कमही शिल्लक आहे. येत्या १५ दिवसांत ही रक्कम जिल्हा बॅँकेने न दिल्यास जिल्हा बॅँकेवर फौजदारी कारवाई करू, असा इशारा जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष प्रमोद मुळाणे यांनी दिला आहे.
बुधवारी (दि. २६) यासंदर्भात जिल्हा मजूर संघाची भूमिका प्रमोद मुळाणे यांनी माध्यमांसमोर मांडली. यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, विठ्ठलराव वाजे, शशिकांत आव्हाड, माजी संचालक संजय चव्हाण, केदा अहेर आदि उपस्थित होते. जिल्हा मजूर संघांतर्गत असलेल्या सुमारे १३०० हून अधिक मजूर संस्थांचेही धनादेश वटत नसल्याने त्यांनी याबाबत मजूर संघाकडे तक्रारी केल्याचे प्रमोद मुळाणे व राजेंद्र भोसले यांनी सांगितले. मार्चअखेर केलेल्या कामांचे धनादेश जिल्हा परिषदेने संबंधित मजूर संस्थांना दिले असून, त्यांच्या खात्यावर रक्कम असूनही ती मिळत नसल्याने जिल्"ातील मजूर संस्थांचे संचालक हवालदिल झाले आहेत. जिल्हा बॅँकेत ठेवींच्या स्वरूपात ठेवलेल्या दोन कोटी रुपयांची रक्कम खात्यात असूनही, पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत धनादेश जिल्हा बॅँकेने परत पाठवून जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला जिल्हा मजूर संघाने ही मुदतठेवींची रक्कम येत्या १५ दिवसांत न दिल्यास यासंदर्भात फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.