लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:47+5:302021-07-25T04:13:47+5:30

नाशिक : शहर व परिसरातसुद्धा प्री-वेडिंग, वेडींग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे; मात्र ड्रोन उड्डाण करताना सुरक्षिततेच्या ...

If you are going to use a drone for wedding shooting, beware! | लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

नाशिक : शहर व परिसरातसुद्धा प्री-वेडिंग, वेडींग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे; मात्र ड्रोन उड्डाण करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. ड्रोनचा वापर करावयाच्या नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त ठरते, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे असल्याचे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्कृष्ट छायाचित्रणासाठी प्री-वेडिंगकरिता वेगवेगळ्याप्रकारे शुटींगकरिता ड्रोनच्या वापरास प्राधान्य दिले जाते. ड्रोनद्वारे शूट केलेले व्हिडिओ हे चांगल्या दर्जाचे येत असल्याने त्याला पसंती दिली जाते. शहरातील वेगवेगळ्या नैसर्गिक ठिकाणांसह प्राचीन मंदिरांचा परिसर, गोदाकाठ, दूधसागर धबधबा तसेच घाटमार्गाला यासाठी पसंती दिली जाते. यावेळी ड्रोनचाही वापर प्राधान्याने केला जातो. दरम्यान, ड्रोन वापरण्यापूर्वी काही नियमांची माहिती असणे आवश्यकच आहे. शहर पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत अद्यापतरी अधिसूचना काढण्यात आलेली नसली तरीदेखील ड्रोनचा वापर करण्याअगोदर ‘डीजीसीए’च्या (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) नियमानुसार जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी पूर्वकल्पना देणे आवश्यकच आहे.

--इन्फो--

ड्रोन उडविण्यासाठी प्रमाणपत्र हवे

ड्रोन उडविण्याकरिता सर्वप्रथम डीजीसीएच्या मान्यताप्राप्त केंद्राकडून आठवडाभराचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्याआधारे डीजीसीएच्या संचालकांकडून ड्रोन पायलटला परवाना मिळतो. परवाना प्राप्त होईपर्यंत प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती प्रमाणपत्राच्याआधारे ड्रोनचा वापर सुरू ठेवू शकते.

ड्रोनविना प्रशिक्षण, विना परवाना उडविणे अवैध असून याबाबत पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाऊ शकते.

--इन्फो---

ड्रोन वापरण्याचे नियम असे...

संरक्षणखात्याशी संंबंधित सर्व केंद्रांचा परिसर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला असतो.

धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील कुठल्याही धरणांच्या परिसरात ड्रोन वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विमानतळाच्या परिसरात तसेच हवाई धावपट्टीच्या भागातसुध्दा ड्रोन वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

ड्रोनचा प्रकार नोंदणी डीजीसीएकडे असणे आवश्यक आहे.

नॅनो ड्रोन हा ५०फूट (१५मीटर) उंचीपेक्षा जास्त उडविणे डीजीसीएच्यानियमाविरुद्ध आहे.

मायक्रो ड्रोन हा २००फूट (६०मीटर) उंचावरच उडविता येऊ शकतो, त्यापेक्षा अधिक उंचीवर उडविणे अवैध ठरू शकते.

...इन्फो--

असे आहेत ड्रोनचे प्रकार

नॅनो- ० ते २५०ग्रॅमपेक्षा कमी वजन

मायक्रो- २५१ ग्रॅम ते २.५ किलोपर्यंत वजन

स्मॉल- २५ किलोपर्यंत वजन

मीडियम- २५ ते १५० किलोपर्यंत वजन

लार्ज -१५० किलोपासून पुढे

--कोट--

ड्रोन उड्डाणापूर्वी डीजीसीए मान्यताप्राप्त कंपनीकडून प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. सध्या मुंबई, बारामती या दोन शहरात अधिकृत प्रशिक्षणसंस्था कार्यान्वित आहेत. आठवड्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या संस्थांकडून प्रमाणपत्र दिले जाते. ड्रोनचा वापर हा कायद्यानेच करायलाच हवा. रेड, ऑरेंज, ग्रीन झोन विचारात घेत ड्रोन वापरायला हवे. ड्रोन केवळ ग्रीन झोनमध्येच अधिकृत ड्रोन उड्डाण करणाऱ्या पायलटकडून उडविला जावा. संवेदनशील क्षेत्रात कोठेही ड्रोनचा वापर करू नये, जेणेकरून सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण होईल.

- प्रणवकुमार चित्ते, अधिकृत प्रशिक्षक, पुणे

--कोट--

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संरक्षण खात्याशी संबंधित तसेच पोलीस खात्याशी संबंधित विविध आस्थापनांचे संवेदनशील क्षेत्र अस्तित्वात आहे. यामुळे आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोनचा वापर करणे कटाक्षाने टाळायला हवे. ड्रोनचा वापर करण्यापूर्वी जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी कल्पना देणे आवश्यक आहे. डीजीसीएकडून परवानगी घेऊनच ड्रोन उड्डाण करावे.

- संजय बारकुंड, पाेलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

240721\24nsk_29_24072021_13.jpg~240721\24nsk_30_24072021_13.jpg~240721\24nsk_31_24072021_13.jpg

ड्रोन डमी ~ड्राेन चे प्रकार ~ड्राेन चे प्रकार 

Web Title: If you are going to use a drone for wedding shooting, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.