आम्ही खाऊ तर तुपाशी... तुम्ही राहा उपाशी!

By Admin | Updated: December 2, 2015 00:03 IST2015-12-02T00:02:15+5:302015-12-02T00:03:06+5:30

बनवाबनवी : कुंभमेळ्यात राबलेल्या हजारो हातांना ‘हातोहात’ प्रमाणपत्राचे वाटप

If we eat, then you should be ... hungry! | आम्ही खाऊ तर तुपाशी... तुम्ही राहा उपाशी!

आम्ही खाऊ तर तुपाशी... तुम्ही राहा उपाशी!

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्यापूर्वी व नंतरही स्व-सत्कार घडवून घेण्याबरोबरच, सातासमुद्रापार जाऊन योग्य नियोजनाचे प्रमाणपत्र घेऊन आलेले जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनी मात्र कुंभमेळा यशस्वी पार पाडण्यात मोठा हातभार लावणाऱ्या हजारो हातांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याऐवजी खाते प्रमुखांच्या हस्ते ‘हातोहात’ प्रमाणपत्राचे वाटप करण्यातच धन्यता मानली आहे. अधिकाऱ्यांचे हे अशा प्रकारचे वागणे म्हणजे ‘आम्ही खाऊ तर तुपाशी, तुम्ही राहा उपाशी’ अशी भावना शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात वर्षभरापासून जिल्ह्यातील जवळपास १९ यंत्रणांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. कामाचे नियोजन, शासकीय बैठका, प्रत्यक्ष कामांना भेटी, वरिष्ठांना अहवाल अशा विविध पातळ्यांवर या यंत्रणांनी कामे केली. त्याचाच परिणाम म्हणून कुंभमेळ्याच्या चारही पर्वण्या निर्विघ्न पार पडण्यात मदतही झाली. विशेष म्हणजे सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून कुंभमेळ्याच्या केलेल्या तयारीवर समाधानी होऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या पर्वण्या यशस्वी पार पडण्यापूर्वीच महापालिकेने आयोजित केलेल्या आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व सरतेशेवटी विभागीय आयुक्तांनी सत्कार करवून घेतला. प्रमुखांचाच सत्कार झाल्याचे पाहून हाताखालच्या यंत्रणेला आणखीच हुरूप आल्याने त्यांनी ऊन, वारा, पावसाची तमा न करता, सिंहस्थाच्या कामात स्वत:ला झोकून दिले व कुंभमेळ्याच्या कार्याला घरचे कार्य समजून यशस्वी पार पाडले. कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल शेवटच्या पर्वणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत या अधिकाऱ्यांना पाचारण करून तेथे पुन्हा त्यांचा यथोचित सत्कार केला. या सत्कारातून अधिकारी मंडळी बाहेर पडत नाही तोच, बोस्टन येथे जाऊन याच अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याचे नियोजनाचे सादरीकरण करून त्याच्या आधारे पुन्हा यशस्वी नियोजनाचे प्रमाणपत्रही घेऊन आले. सिंहस्थ कुंभमेळा आटोपून दोन महिन्यांचा कालावधी उलटल्याने आता तरी आपल्या कामाचे चीज होईल, सिंहस्थात दिलेल्या योगदानाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दोन शब्द कौतुकाचे व पाठीवर शाबासकीची थाप पडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नशिबी मात्र उपेक्षाच पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यात केलेल्या कामाचे छापील प्रमाणपत्र तयार करून ते त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून, ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुंभमेळ्याचे काम केले असेल, त्यांना ते वाटप करण्याचे फर्मान सोडण्यात आले
आहे. आत्तापर्यंत चारशेहून अधिक प्रमाणपत्रांचे ‘हातोहात’ वाटप करण्यात आले असून, अशा ‘हातोहात’ मिळालेल्या प्रमाणपत्राचे कौतुक वाटण्याऐवजी कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुटप्पी वर्तणुकीविषयी तीव्र संतापच व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If we eat, then you should be ... hungry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.