भाजपाचे सरकार आल्यास उद्योगांची मोठी गुंतवणूक
By Admin | Updated: October 13, 2014 00:50 IST2014-10-13T00:36:13+5:302014-10-13T00:50:19+5:30
भाजपाचे सरकार आल्यास उद्योगांची मोठी गुंतवणूक

भाजपाचे सरकार आल्यास उद्योगांची मोठी गुंतवणूक
नाशिक : महाराष्ट्रात उद्योगांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा मिळत नसल्यानेच राज्यातील उद्योग गुजरातसह अन्यत्र जात आहेत. मात्र महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यास गुजरातमध्ये जानेवारीत भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेतून महाराष्ट्रातही उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी गुजरात सरकार मदत करेल, असे आश्वासन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी केले.
दादासाहेब गायकवाड सभागृहात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आनंदीबाई पटेल यांच्या सभेचे आयोजन केले होते. बारा वाजेची सभा तब्बल तीन वाजता सुरू झाली. आनंदीबाई पटेल यांनी गुजरात सरकारने राबविलेल्या योजनांचा यावेळी पाढाच वाचला. फक्त महिलांसाठी स्वतंत्र चार हजार कोटींची तरतूद व तसा धनादेश देऊन आल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात सरकारने युवकांसाठी रोजगार, आरोग्यासाठी ‘मॉ कार्ड’चा आधार यांसह अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या असून, हे केवळ बहुमत असलेल्या सरकारामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीच्या सरकारमध्ये असे क्रांतिकारी निर्णय घेता येत नाही. एकेका आमदाराचा ‘भाव’ वधारतो. प्रत्येक जण मंत्रिपद मागतो. त्यामुळे संपूर्ण बहुमत असलेल्या सरकारलाच जनतेने संधी दिली पाहिजे. गुजरातमध्ये २००१ पासून संपूर्ण बहुमत असलेले भाजपा सरकार आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये अनेक विकासाच्या योजना राबविल्या गेल्या. देशात गुजरात हे विकासाचे मॉडेल म्हणून गौरविले गेले आहे. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, पुष्पा शर्मा, उमेदवार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, तसेच अंजली दराडे, संभाजी मोरूस्कर, भारती बागुल, प्रा. कुणाल वाघ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)