वीजदर कमी केल्यासच‘मेक इन महाराष्ट्र’
By Admin | Updated: January 24, 2016 22:55 IST2016-01-24T22:54:31+5:302016-01-24T22:55:13+5:30
उद्योजकांच्या भावना : उद्योगमंत्र्यांसमवेत झाली बैठक

वीजदर कमी केल्यासच‘मेक इन महाराष्ट्र’
सातपूर : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या औद्योगिक विजेचे दर अधिक असल्याने हे दर कमी केले तरच ‘मेक इन महाराष्ट्र’ संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात येईल, अशी मागणी मुंबई येथे झालेल्या उद्योग आणि ऊर्जामंत्र्यांच्या बैठकीत नीमा पदाधिकाऱ्यांनी केली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रमुख उपस्थितीत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव मुकेश हुल्लड, उद्योग खात्याचे सचिव संजय राव, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदि अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व वीज दराची विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी, औष्णिक प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी केली. या बैठकीस निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर पॉवर कमिटीचे मिलिंद राजपूत, आशीष नहार, सुधीर बडगुजर आदिंसह राज्यातील विविध औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.