मूर्तीदान आकडेवारीचे गौडबंगाल कायम
By Admin | Updated: October 5, 2015 23:02 IST2015-10-05T23:02:21+5:302015-10-05T23:02:48+5:30
मनपाचे तोंडावर बोट : उलटसुलट चर्चा

मूर्तीदान आकडेवारीचे गौडबंगाल कायम
नाशिक : महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दानाचे गौडबंगाल कायम असून, पुण्यात नाशिकपेक्षा जास्त गणेशमूर्ती असताना येथे विसर्जित मूर्तींच्या दानाची संख्या इतकी कशी, याचा खुलासा महापालिका अद्यापही करू शकलेली नाही. उलट पाण्यातील मूर्तीच बाहेर काढून ठेवून त्या दान झाल्याचे भासविले जात असल्याची चर्चा आहे.
नदीप्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सवातील गणेशमूर्ती दान कराव्यात, यासाठी सेवाभावी संस्था आणि महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जातात. सेवाभावी संस्था केवळ विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारत असल्या तरी त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी अंतिमत: महापालिकेवरच असते. दरवर्षी विसर्जित मूर्ती दान करण्याची आकडेवारी वाढतच असून, ती आकडेवारी खरी की खोटी याविषयी शंका निर्माण झाली आहे. यंदाच्या गणेश उत्सवानंतर महापालिकेला २ लाख ७१ हजार ३८६ मूर्ती दान झाल्याचा महापालिकेचा दावा आहे.
नाशिक शहरापेक्षा पुणे शहर हे तिप्पट-चौपट मोठे आहे. शिवाय तेथे नाशिकपेक्षा मोठ्या स्वरूपात गणेशोत्सवही मोठा असतो आणि तेथेही घराघरात गणपती प्रतिष्ठापना होत असते. मात्र असे असताना तेथे केवळ १ लाख १३ हजार गणेशमूर्तींचे दान झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. मग, नाशिक शहरात इतक्या मोठ्या संख्येने गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)