देवीच्या मूर्तीवर फिरवण्यात येतोय अखेरचा हात
By Admin | Updated: September 27, 2016 01:15 IST2016-09-27T01:14:54+5:302016-09-27T01:15:23+5:30
वेध नवरात्रोत्सवाचे : बंगाली बांधवांकडून मूर्तीला विशेष मागणी

देवीच्या मूर्तीवर फिरवण्यात येतोय अखेरचा हात
नाशिक : गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. अवघ्या पाच दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला असून, शहरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील देवी मंदिरांना रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तींवरदेखील अखेरचा हात फिरवण्यात येत आहे.
दुर्गा माता, कालिका माता, अंबे माता, शेरावाली माता अशी विविध देवींची रूपे नाशिकचे मूर्तीकार गौतम पाल यांनी साकारल्या आहेत. गौतम पाल यांची ही दुसरी पिढी असून बंगाली देवी बनविण्यात त्यांचे विशेष कसब आहे. दरवर्षी नवरात्रासाठी साकारण्यात येणाऱ्या मूर्तींसाठी एप्रिल महिन्यापासूनच तयारी करण्यास सुरुवात होते. नाशिकचे कलाकार गौतम पाल यांनी बनविलेल्या देवी मूर्तींना नाशिकसह देवळाली, ओझर, भुसावळ, जळगाव येथून मागणी आहे. २५ फूट बाय १८ फूट मूर्ती साकारण्यासाठी खास कोलकाता येथील होवरा नदीतील माती मागवण्यात आली आहे, तसेच देवीला सजवण्यासाठी
लागणारा साजशृंगारदेखील कोलकाता येथूनच मागविण्यात आला आहे.
कुठल्याही प्रकारचे प्लास्टर आॅफ पॅरिस किंवा सीमेंट तसेच कुठल्याही साच्याशिवाय या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. बांबूची रचना आणि वाळलेला चारा यांची लाकडी स्टॅण्डवर उत्कृष्ट बांधणी करून यावर मातीच्या देवीची भव्य मूर्ती साकारण्यात येते. मुख्य देवीसह लक्ष्मी, सरस्वती, गणपती, कार्तिक तसेच महिषासुर राक्षस आणि देवीचे वाहन असलेला वाघ अशी भव्य २५ फूट आडव्या मंचावर अगदी रेखीवपणे या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. गेल्या सात महिन्यांहून अधिक कालावधीपासून आठ ते दहा कारागीर या देवी मूर्ती साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत. गांधीनगर मैदान येथे बंगाली बांधवांकडून साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी गेल्या ६४ वर्षांपासून पाल कुटुंबीयांकडूनच मूर्ती बनविण्यात येत आहेत.
मातीपासून घडविण्यात आलेल्या मूर्ती पाहून भाविकांचे अक्षरश: डोळे दीपतात. मूर्तीच्या तोंडावरील हावभाव, रेखीव डोळे यांसह अत्यंत सूक्ष्मपणे केलेले कोरीव काम यामुळे देवीचे रूप अधिकच खुलते आणि भाविकांकडून अशा मूर्तीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पाल यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)