तपोवनातील स्थानिक रहिवाशांची ओळखपत्रासाठी तारांबळ
By Admin | Updated: August 10, 2015 23:33 IST2015-08-10T23:27:37+5:302015-08-10T23:33:59+5:30
यादीत नावे सापडेना : पोलीस चौकीसमोर गर्दी

तपोवनातील स्थानिक रहिवाशांची ओळखपत्रासाठी तारांबळ
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या कडेकोट बंदोबस्ताचा फटका तपोवन परिसरातील स्थानिक रहिवाशांना बसत आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या बॅरिकेड्समधून या रहिवाशांच्या वाहनांना बाहेर जाण्याची परवानगी मिळावी म्हणून पोलीस यंत्रणेकडून ओळखपत्राचे वाटप करण्यात येत आहे; परंतु अनेक नागरिकांना अद्याप ओळखपत्र मिळाले नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधुग्राममध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या साधू आणि भाविकांमुळे पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्तात दिवसेंदिवस वाढ करण्यात येत असल्याने या भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशींची मात्र कोंडी झाली असून, त्यांना बाहेर फिरणेदेखील मुश्किल झाले आहे. ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅरिकेट्समुळे वाहने घेऊन जाणे अवघड झाले असून, यावर उपाययोजना म्हणून वाहनपास देण्यात येत आहेत. सदर वाहनपास तयार करण्यासाठी स्थानिक रहिवाशांकडून अर्ज भरून घेण्यात आले. परंतु रहिवाशांच्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आल्याचे सांगत पोलीस यंत्रणेकडून त्याची छाननी करण्यात आली. या छाननीनंतर सुमारे १५०० रहिवाशांचे पास (वाहनपरवाना पत्र) तयार करण्यात आले. त्यापैकी ५०० स्थानिक रहिवाशांना तपोवन चौकातील पोलीस चौकीतून पासचे वाटप करण्यात आले. पास तयार झालेल्यांची यादी पोलीस चौकीबाहेर लावण्यात आली असून, ती पाहण्यासाठी झुंबड उडत आहे. काही लोकांची नावेच या यादीत नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच तपोवन परिसरातील अन्य ठिकाणी म्हणजे मळे भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना बॅरिकेट लावल्यामुळे मोठा फेरा पडणार आहे. (प्रतिनिधी)